निकालाआधीच मोदी ठरले चॅम्पियन; 'एनडीए'मध्ये उत्साह

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल मंत्रिमंडळाचे आभार मानले. 

दरम्यान, आजच्या बैठकीत मोदींनी आभार प्रदर्शन करतानाच काही सूचक इशारे दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. सत्ताप्राप्तीनंतरची मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख, संभाव्य मंत्रालये आदींबाबत त्यांनी व शहा यांनी काही सूतोवाच केले. नव्या मंत्रिमंडळात नितीशकुमार व अण्णा द्रमुक या किमान दोन मोठ्या पक्षांना वाटा द्यावा लागणार असल्याने भाजपकडील बड्या मंत्रिपदांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे राज्यसभेच्या दारातून आलेल्या काही नशीबवान मंत्र्यांना पदांवर पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता वर्तविली जाते. भाजप वर्तुळात याचीच चर्चा जोरदार आहे.

येत्या 23 मे रोजी मोदी सरकारची संभाव्य विजयचिन्हे दिसू लागल्याने भाजपसह "एनडीए' परिवार प्रचंड उत्साहात आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, हरसिमरत कौर बादल, रामदास आठवले या भाजपच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांबरोबरच राजनाथसिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, स्मृती इराणी आदी भाजपचे मंत्री उपस्थित होते. 

साडेपाचच्या सुमारास मोदींचे आगमन झाल्यावर प्रथम शहा यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर बैठकीच्या ठिकाणी मोगऱ्याचा भलामोठा हार घालून मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पासवान, राजनाथसिंह व गडकरी यांनी हाराची टोके धरल्याचे दिसत होते.

विजेत्याच्या थाटात झालेल्या या अभिनंदनाचा मोदींनी नम्रपणे स्वीकार केला. विरोधकांची आघाडी मोदींवर एकीकडे ईव्हीएम अस्त्र सोडत असतानाच, मंत्रिमंडळ बैठकीत व नंतरच्या मेजवानीतही 27 पक्षांची सत्तारूढ "एनडीए' आघाडी अभंग व एकदिलाने खंबीरपणे साथ-साथ असल्याचा संदेश मोदींना द्यायचा होता, तो आज पूर्णपणे साध्य झाला. 

अशोका हॉटेलमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांच्या बैठकीसाठी मोदी व शहा रात्री सव्वाआठच्या सुमारास एकत्रितच पोचले. ज्यांच्या अनुपस्थितीची अफवा काही वाहिन्यांनी सकाळपासून पसरविली होती ते उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्य यांच्यासह मोदींचे सर्वप्रथम अभिनंदन केले. मोदींनी आदित्य यांची विशेष दखल घेतली. त्यापाठोपाठ रामविलास व चिराग पासवान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे प्रकाशसिंग व सुखबीर बादल, अण्णा द्रमुकचे पलानीसामी व ओ. पनीरसेल्वम, आठवले आदींनीही मोदींचे त्या-त्या राज्यांच्या पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. 

जेवणात पुरणपोळी

आजच्या मेजवानीवेळी घटकपक्षीय नेत्यांच्या राज्यांतील खास पदार्थ आवर्जून तयार ठेवण्यात आल्याची माहिती आहे. ठाकरेंसाठी अस्सल मराठी पुरणपोळी, बादल यांच्यासाठी पंजाबी पराठा व लस्सी, पनीरसेल्वम व सहकाऱ्यांसाठी इडली-डोसा, तर नितीशकुमार-पासवानांसाठी लिट्टी चोखा यांचा सरंजाम असल्याची माहिती मिळाली. मराठी पुरणपोळी दिल्लीतील एका प्रसिद्ध महिला केटरर्सच्या मार्गदर्शनाखाली बनविल्याचेही समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Become Champion Before Loksabha Results