‘टीम मोदी‘मध्ये फेरबदलाचे संकेत, शिंदे गटाला ‘लॉटरी’, श्रीकांत यांना मंत्रिपद? | Narendra Modi Cabinet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Shrikant Shinde

‘टीम मोदी‘मध्ये फेरबदलाचे संकेत, शिंदे गटाला ‘लॉटरी’, श्रीकांत यांना मंत्रिपद?

Narendra Modi Cabinet

नवी दिल्ली  :  तुम्ही दिल्लीतील शास्त्री भवन, निर्माण, उद्योग, रेल्वे, परिवहन भवन आदी मंत्रालयांमध्ये जर सध्याच्या काळात 'डोळे  व कान' उघडे ठेवून गेलात तर तुम्हांस प्रत्येक मंत्रालयाच्या बाबूशाहीत विशेषतः मंत्र्यांचे पीए व ओसएसडी आदी वर्गाची वाढती ‘अस्वस्थता‘ स्पष्ट जाणवेल.... होय, नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आणखी एका फेरबदलाचे संकेत मिळाले असून संभाव्य ‘ड्रीम टीम मोदी' मध्ये कोण येणार व कोण जाणार याबाबत हाताच्या बोटावर मोजणारे ज्येष्ठ भाजप नेते सोडले तर सारीकडे सुप्त अस्वस्थता आहे.

संभाव्य फेरबदलात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला लॉटरी लागण्याची चिन्हे असून भाजप नेत्यांसाठी अत्यंत कठोरपणे लावले जाणारे ‘निकष' मोदी यांनी बाजूला ठेवल्यास मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिल्लीत मंत्रीपद मिळण्याची शक्यता दाट आहे. (Shrikant Shinde)

टीम मोदी-२ म्हणजेच मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील ( भाजपच्या म्हणण्यानुसार तिसरी टर्म सुरू होण्यापूर्वीची!)  ही अखेरची फेररचना असेल, असे मानले जात आहे. मात्र फेरबदल होणार काय, तो कधी होणार व त्यात नेमके काय होणार, या साऱ्या बाबींविषयी फक्त एका व्यक्तीला (पंतप्रधान) माहिती आहे यावर झाडून साऱ्यांचे एकमत दिसते.

हेही वाचा: Mahua Moitra : महुआ मोईत्रा PM मोदींच्या वाटेवर; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, काय माहिती...

कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. अपेक्षेनुसार काम नसणाऱ्या मंत्र्यांना ड्रीम टीममध्ये स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. दुसरीकडे विशेषतः कर्नाटक, तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही खासदारांना अच्छे दिन येऊ शकतात.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक १६ व १७ जानेवारीला दिल्लीत होत आहे. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला पूर्ण होणार असला तरी त्यांच्याचकडे भाजपची सूत्रे ठेवली जातील याचे संकेत हिमचल प्रदेशातील भाजप पराभवानंतर मिळाले आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू आहे. त्यामुळे मोदी व अमित शहा यांच्यातील चर्चा पूर्ण झाली तर १५ ते २० जानेवारी दरम्यान मंत्रीमंडळ फेररचना होऊ शकते. (Bjp National Executive Meeting Delhi)

यावर्षी होऊ घातलेल्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हीच टीम मोदी पक्षाचे नेतृत्व करेल. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांना ‘नवीन जबाबदाऱ्या‘ मिळू शकतात असे मानले जाते. हिमाचलमधील पराभवानंतर ठाकूर घराणे बचावात आहे. गुजरात निवडणुकीतील  विक्रमी विजयाचे रणनीतीकार मानले जाणारे सी आर पाटील यांना दिल्लीत पक्षसंघटनेतच पण महत्त्वाच्या भूमिकेत आणले जाऊ शकते. त्यांना कॅबिनेट मंत्री केले जाणार हे अद्याप निश्चित नाही. कर्नाटकात येदियुरप्पा यांच्या निकटवर्ती शोभा करनलाजे यांना यापूर्वीच मंत्री केल्यावर आणखी किमान २ चेहरे मंत्रीमंडळात येऊ शकतात. संसदेतील सर्वांत तरूण खासदार तेजस्वी सूर्या यांना मंत्रीमंडळात घेतल्यास भाजप युवा मोर्चासाठी नवा चेहरा शोधावा लागेल. मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजप-शिंदे गटाच्या प्रचाराचा शंखनाद करण्यासाठी खुद्द पंतप्रधान १९ जानेवारीला मुंबईत जात आहेत.

हेही वाचा: Modi Cabinet : BHIM UPI च्या ट्रांजॅक्शनवर मिळणार इन्सेटिव्ह; वाचा महत्त्वाचे निर्णय

ज्या मंत्र्यांची कामगिरी ‘पक्षनेतृत्वाच्या दृष्टीने‘ समाधानकारक नाही त्यात अनेक नावांची चर्चा दिल्लीत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह, ज्येष्ठ मंत्री अश्विनी चौबे, दिल्लीत विजयाचे स्वप्न अधुरेच राहिल्याने मीनाक्षी लेखी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड, साध्वी निरंजना ज्योती, निशीथ प्रामाणिक आदींच्या जागी नवे चेहरे आणले जातील असे समजते. किमान ३ कॅबीनेट मंत्र्यांची भाजप पक्षसंघटनेत बदली निश्तिच मानली जाते.

टॅग्स :Modi Government