
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाचा गौरव जगात वाढत आहे. ते २०-२० तास काम करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी खपत आहेत. त्यांच्यामुळेच देश जागृत होत आहे.
नागपूर - आज पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाचा गौरव जगात वाढत आहे. ते २०-२० तास काम करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी खपत आहेत. त्यांच्यामुळेच देश जागृत होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूर विद्यापीठाने सक्षम भारताच्या उभारणीसाठी सहयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते. कोश्यारी म्हणाले, देशाचा स्वाभिमान जागृत झाला आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही; हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता. पण आमचा इतिहास गौरवशाली आहे.
अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटिशांनाही या देशाने धुळ चाखली आहे. आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र, आज जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावे ठेवायचे, असेही ते म्हणाले.
संसदेच्या कामकाजामुळे उपस्थित न राहू शकलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आपला व्हिडिओ संदेश पाठविला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते अजंता फार्माचे पुरुषोत्तम अग्रवाल यांचा जीवनसाधना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय ‘शतदिप पर्व’ या विशेषांकाचे लोकार्पण करण्यात आले.
विद्यापीठांनीच उचलावी जबाबदारी
डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या विवेचनात तीन मुद्दे मांडले. यात विद्यापीठाने देशाची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी योगदान देणे, आंतरिक विषमता दूर करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आणि अस्थिरतेची मानसिकता दूर सारून उद्योजकतेची मानसिकता रुजविण्याचे काम विद्यापीठांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. हे तीन टप्पे पूर्ण केल्यावर आपोआप विद्यापीठाचे रँकिंग आणि जागतिक पातळीवरील रँकिंगमध्ये सुधारणा होईल असे मत व्यक्त केले.
राजकारण्यांची नावे विद्यापीठाला नकोच
महाराष्ट्रात असलेल्या बऱ्याच विद्यापीठांना येथील संतांची नावे दिली आहेत. ही बाब अतिशय सुंदर सांगून त्यांनी विद्यापीठांना राजकारण्यांची नावे देण्यापेक्षा संतांची नावे द्यावीत, असे म्हणत कोश्यारींनी निशाणा साधला. विशेष म्हणजे देशातील काही विद्यापीठांना पं. जवारलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशी नावे आहेत. ही नावे बदलण्याबाबत यापूर्वीही बरेचदा चर्चा रंगली आहे.