‘नरेंद्र मोदी स्टेडियम’चे नाव बदलू; काँग्रेसचा जाहीरनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Stadium name Change

‘नरेंद्र मोदी स्टेडियम’चे नाव बदलू; काँग्रेसचा जाहीरनामा

अहमदाबाद : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यातील सर्व घटकांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्‍वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहे. सत्तेवर आल्यास अहमदाबाद येथील स्टेडियमला दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव बदलून सरदार पटेल स्टेडिअम असे करणार असल्याचेही सांगण्यात आले.

काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थित आज पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. ते म्हणाले, ‘‘जर गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आली तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पक्षाचा जाहीरनामाच अधिकृत दस्तावेज म्हणून स्वीकारला जाईल.

युवकांवरही खैरात

गुजराती युवकांसाठी राज्यात दहा लाख रोजगार उपलब्ध करणार असल्याचे सांगून सरकारी आणि निम्न सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. तसेच बेरोजगार युवकांना तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी सार्वभौम शिक्षण व्यवस्था लागू करून त्याद्वारे स्वस्तात शिक्षण उपलब्ध करणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

काँग्रेसची आश्‍वासने

  • सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण

  • सरकारी नोकऱ्यांमधील आऊटसोर्सिंग बंद करणार

  • दूध उत्पादकांना पाच रुपये प्रति लिटर अंशदान

  • राज्यात इंग्रजी माध्यमाच्या तीन हजार सरकारी शाळा सुरू करणार

  • विद्यार्थिनींना पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण मोफत

  • गेल्या २७ वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार

  • भ्रष्टाचार विरोधी कायदा आणून दोषींना तुरुंगवास घडविणार

  • जुनी निवृत्ती योजना मंजूर

  • कुपोषण रोखण्यासाठी आणि गरिबांना पौष्टिक अन्न देण्यासाठी इंदिरा योजना जाहीर करणार