मृत्युदर तुलनेत कमीच; मोदींचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 27 July 2020

‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या ६७ व्या भागात बोलताना पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिवसानिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेचे स्मरण करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

नवी दिल्ली - कोरोनाशी संघर्ष करताना भारतातील मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केला. देशातील कोरोना योद्ध्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना, कोरोनाचा उपद्रव लगेच शांत होण्याची चिन्हे नसल्याने खबरदारी घेऊन आपापली कामे सुरू ठेवावीत, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. 

‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या ६७ व्या भागात बोलताना पंतप्रधान मोदींनी कारगिल विजय दिवसानिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेचे स्मरण करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले. सर्वांशी विनाकारण शत्रुत्व करण्याचा दुष्ट व्यक्तीचा स्वभावच असतो. हित करणाऱ्याचेही तो नुकसान कसे करता येईल याचा विचार करतो. कारगिलमध्ये घुसखोरी करून पाकिस्तानने भारतीय भूमी बळकावण्याचे आणि आपल्या अंतर्गत कलहावरून लक्ष विचलीत करण्यासाठी दुःस्साहस केले होते, असे शरसंधान मोदींनी केले. कोरोना योद्ध्यांनाही अभिवादन करताना पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळवणे आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी संकल्प घेण्याचे देशवासीयांना आवाहन केले. मागील काही महिन्यांपासून संपूर्ण देशाने कोरोनाचा ज्या एकजुटीने मुकाबला केला आहे त्यामुळे अनेक शंका निकाली निघाल्या आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. एवढेच नव्हे तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही जगभरातील बहुतांश देशांपेक्षा कमी आहे. भारत आपल्या लक्षावधी नागरिकांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरला असल्याचा दावाही मोदींनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना संकट अद्याप टळलेले नाही. अनेक ठिकाणी वेगाने कोरोना संक्रमण होते आहे. त्यामुळे कोरोना आताही, पूर्वी इतकाच घातक आहे हे लक्षात ठेवावे लागेल. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी म्हणाले 
- स्वातंत्र्यदिनी देशवासीयांनी कोरोनापासून मुक्ती मिळविण्याचा संकल्प सोडावा 
- रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदीक काढे घेत राहा 
- मास्क लावायला कंटाळा करू नका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi today claimed that India mortality rate while fighting the Corona is very low compared to other countries