पृथ्वीच्या संरक्षणासाठी पहिले पाऊल यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NASA Double Asteroid Direction Test successful

पृथ्वीच्या संरक्षणासाठी पहिले पाऊल यशस्वी

केप कॅनाव्हेराल : पृथ्वीवरील भविष्यातील संभाव्य संकट टाळता यावे, यासाठी प्रचंड वेगातील अवकाश यान लघुग्रहावर धडकविण्याचा ‘नासा’ चा प्रयोग यशस्वी झाला आहे. जगातील पहिली ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेले ‘डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ (डार्ट) हे यान सोमवारी पहाटे चार वाजून ४४ मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) डिमॉर्फोस या लघुग्रहाला धडकविण्यात आली.

डिमॉर्फोस हा आकाराने लहान असून ‘डिडिमॉस’ या लघुग्रहाचा चंद्र आहे. पृथ्वीला या लघुग्रहांकडून काहीही धोका नाही. यामुळेच भविष्यात लघुग्रहांच्या धडकेपासून जगाचा बचाव करण्यासाठी या पहिल्या चाचणीसाठी त्यांची निवड योग्य ठरली. अमेरिकेतील मेरिलँडमधील लॉरेल येथील ‘नासा’च्या जॉन हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी (एपीएल)ने हा प्रयोग यशस्वी झाल्याची घोषणा केली.

भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारी उल्का अथवा धूमकेतू आढळला तर त्यांची दिशा बदलून आपल्या वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी या प्रयोग करण्यात आला. ‘‘ग्रह संरक्षणासाठी ‘डार्ट’द्वारे केलेला हा ऐतिहासिक प्रयोग आहेच, शिवाय सर्व मानवजातीसाठी लाभदायी ठरणारे हे एकतेची मोहीम आहे,’’असे ‘नासा’चे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले. आपली पृथ्वी आणि अंतराळ याचा अभ्यास ‘नासा’ करीत आहे. तसेच आपल्या घराचे (पृथ्वी) संरक्षण कसे करता, येईल. यावरही काम सुरू आहे. यासाठी केलेल्या चाचणीने आंतरराष्ट्रीय सहकार्याने वैज्ञानिक कल्पनेला वैज्ञानिक सत्यात रूपांतरित केले आहे, असेही ते म्हणाले.

‘डार्ट’च्या परिणामासाठी

 • डिमॉर्फोस लघुग्रहाला यानाद्वारे धडक

 • लघुग्रहाची कक्षा किती बदलली हे अचूकपणे मोजण्यासाठी हा या चाचणीचा एक प्राथमिक उद्देश आहे

 • जमिनीवरील दुर्बिणीद्वारे डिमॉर्फोस’चे निरीक्षण करणार

 • धडकेमुळे डिमॉर्फोसची कक्षा सुमारे एक टक्क्याने किंवा अंदाजे दहा मिनिटांनी कमी होईल, अशी संशोधकांची अपेक्षा

 • लघुग्रहाची दिशा नेमकी किती बदलली हे समजण्यासाठी काही दिवस अथवा आठवड्यांचा कालावधी लागणार

‘डार्ट’ची ओळख

 • डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ (डार्ट) ही नवी तंत्रज्ञान प्रणाली व यानाचे नाव

 • व्हेंडिंग यंत्राच्या आकाराच्या ‘डार्ट’चे गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपण

 • ‘डार्ट’वरील कॅमेऱ्याने धडकेपूर्वी एक तास आधी ‘डिमॉर्फोस’चा शोध घेतला

आपल्या सूर्यमालेतील अनेक लघुग्रह आणि धूमकेतूंनी आपण वेढलेले आहोत. त्यापैकी फार कमी पृथ्वीसाठी संभाव्य धोकादायक आहेत. तरी भविष्यात पृथ्वीशी टक्कर होण्याच्या मार्गावरील अशा लघुग्रहांपासून बचाव करण्यासाठी आपली सुरक्षा यंत्रणा तयार करण चांगले आहे.

- क्रिस्फिन कार्तिक, शास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बंगळूर

लघुग्रहांची दिशा बदलण्याच्या प्रयत्नासाठी ‘डार्ट’ ही प्रायोगिक मोहीम आहे. भविष्यात मोठा उपग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता गृहित धरुन आपण त्याला कसे तोंड देणार हा प्रश्‍न उपस्थित राहतो. त्यासाठी ‘डार्ट’सारखी मोहीम उपयुक्त आहे.

- गौतम चट्टोपाध्याय, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ‘नासा’

पहिल्या चाचणीसाठी

 • ९६ लाख किमी लघुग्रहाचे अंतर

 • २२,५०० प्रती किमी ‘डार्ट’चा वेग

 • ३२. ५० कोटी डॉलर मोहिमेवरील खर्च

 • ५७० किलो अंतराळयानाचे वजन

डिडिमॉस व डिमॉर्फोस लघुग्रह

 • लघुग्रहांची ही जोडी अनेक वर्षांपासून सूर्याभोवती फिरत आहे

 • लघुग्रहांची ही नावे ग्रीक भाषेतील आहेत

 • यापैकी एकाही लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही

 • डिमॉर्फोस हा डिडिमॉस लघुग्रहाचा चंद्र आहे

 • डिमॉर्फोस’चा व्यास केवळ १६० मीटर आहे

 • ‘डिडिमॉस’च्या कक्षेत तो फिरतो

 • अत्यंत वेगाने फिरणारा ‘डिडिमॉस’ डिमॉर्फोस’च्या पाच पट मोठा आहे

 • त्याचा आकार ७८० मीटर आहे

टॅग्स :environmentEarthNASA