Video : ...म्हणून अग्निपथ योजना देशासाठी महत्त्वाची : अजित डोवाल | Agnipath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit dowal.

Video : ...म्हणून अग्निपथ योजना देशासाठी महत्त्वाची : अजित डोवाल

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून केंद्राच्या आग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) विरोध होत असताना आता यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Dowal) यांनी यावर भाष्य केले आहे. अग्निपथ योजना ही काळाची गरज असल्याचे सांगत ते म्हणाले की, भारताभोवतीचे वातावरण बदलत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत लष्करातही बदल आवश्यक असल्याचे मत डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना व्यक्त केले आहे. (Ajit Dowal On Agnipath Scheme)

डोवाल म्हणाले की, बदलत्या काळानुसार लष्करात (Indian Army) बदल करणे गरजेचे असून, या बदलाकडे एका दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. अग्निपथ ही एक स्वतंत्र योजना नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी (PM Modi) सत्तेवर आले तेव्हा भारताला सुरक्षित आणि मजबूत बनवणे हे त्यांचे प्रमुख प्राधान्य होते. यापूर्वी जे आपण करत होतो, भविष्यातही तेच करत राहिलो, तर आपण सुरक्षित राहूच असे नाही. त्यामुळे भविष्याची तयारी करायची असेल तर, बदलावे लागेल आणि त्यासाठी अग्निवीर योजना आवश्यक होती, कारण भारतात भारताच्या आजूबाजूचे वातावरण बदलत आहे.

अदृश्य शत्रूविरुद्ध आमची लढाई

डोवाल म्हणाले की, युद्धे आता मोठ्या बदलातून जात असून, आताची वाटचाल ही संपर्करहित युद्धाकडे (War) वाटचाल आहे. आपली लढाई ही अदृश्य शत्रूंशी आहे. शस्त्राऐवजी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्याची तयारी करायची असेल तर, स्वतःला बदलावे लागेल. त्यासाठी यंत्रणा आणि संरचनांमध्ये बदल आवश्यक आहेत. तंत्रज्ञानात बदल करण्याची गरज आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ, धोरणांमध्ये बदल करण्याची गरजेचे असल्याचे डोवाल म्हणाले.

अग्निवीर परिवर्तनाचा वाहक बनेल

जेव्हा अग्निवीर सैन्यात चार वर्षे सेवा करून परत जाईल, तेव्हा तो समाजातील इतर नागरिकांपेक्षा अधिक कुशल आणि प्रशिक्षित असेल. पहिला अग्निवीर निवृत्त होईल तेव्हा तो २५ वर्षांचा असेल. तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची होईल. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला त्यावेळी अशा कुशल लोकांची गरज भासेल आणि तेव्हा हेच अग्निवीर परिवर्तनाचे वाहन बनतील असा विश्वास डोवाल यांनी व्यक्त केले. आज भारतात बनवलेल्या AK-203 सोबत नवीन असॉल्ट रायफल सैन्यात समाविष्ट करण्यात येत आहे. ही जगातील सर्वोत्तम असॉल्ट रायफल आहे. लष्करी उपकरणांमध्ये बरीच प्रगती होत असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :IndiaArmyajit dowal