VIDEO: मोदींना अडवणारे आंदोलक भाजपचेच? नवाब मलिकांचं ट्विट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींना अडवणारे आंदोलक भाजपचेच? नवाब मलिकांचं ट्विट चर्चेत

मोदींना अडवणारे आंदोलक भाजपचेच? नवाब मलिकांचं ट्विट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला खिंडार पडल्याचा गंभीर प्रकार आज घडला. सुरक्षेतील या त्रुटीसाठी केंद्राने राज्य सरकारला जबाबदार धरले असून गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून तत्काळ अहवाल मागविला आहे. या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे युद्ध भडकले आहे. काँग्रेसचे खुनी इरादे निष्फळ ठरले, अशी तोफ भाजपने काँग्रेसवर डागली तर, गर्दीअभावी पंतप्रधानांची सभा अयशस्वी ठरणार होती या भीतीपोटी भाजपची ही बहाणेबाजी सुरू असून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणे थांबवावे, राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. या सगळ्या घडमोडींदरम्यान आता महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा करणारं ट्विट केलंय.

हेही वाचा: PM मोदींच्या गैरसोयीबद्दल क्षमस्व मात्र शेतकऱ्यांवर लाठीचार्ज नाही: CM चन्नी

नवाब मलिक यांनी एका व्हिडीओचे ट्विट रिट्वीट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक राज्यामध्ये सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच आयबीचे डेप्यूटी डायरेक्टर अथवा संयुक्त डायरेक्टर रँकचे ऑफिसर तैनात असतात. पंजाबच्या आयबी अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत आधीच माहिती मिळाली नव्हती का? या व्हिडीओमध्ये पाहा आंदोलनकर्ते घोषणा देत मोदींच्या किती जवळ गेले आहेत. असं या व्हिडीओला ट्विट करणाऱ्या व्यक्तीने लिहलं आहे.

हा व्हिडीओ रिट्विट करत नवाब मलिकांनी विचारलंय की, आंदोलकांनी भाजपचा झेंडा का धरला आहे? हे लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी घोषणा देणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती भाजपचा झेंडा घेऊन उभा असलेला दिसून येतो आहे.

जेपी नड्डांची टीका

या गंभीर प्रकाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने तपशीलवार निवेदन जाहीर केले असून सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटीसाठी पंजाबमधील सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाबद्दल आणि प्रवास मार्गाबद्दल पंजाब सरकारला आधीच सांगण्यात आले होते. प्रशासकीय रचनेनुसार पंजाब सरकारने आपत्कालीन योजना तयार ठेवणे अपेक्षित होते, असे त्यात म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना लक्ष्य केले. पंजाबच्या मुख्य सचिवांनी आणि पोलिस महासंचालकांनी मार्ग सुरक्षित असल्याचे ‘एसपीजी’ला सांगितले होते असे असताना आंदोलनकर्त्यांना जाणीवपूर्वक पंतप्रधानांच्या मार्गात जाऊ दिले आणि त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी याप्रकरणी दूरध्वनीवरून बोलण्यास आणि यावर तोडगा काढण्यास नकार दिला. पंजाब सरकारची ही रणनीती लोकशाहीला मारक असल्याचा प्रहार नड्डा यांनी केला.

हेही वाचा: "मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

स्मृती इराणी भडकल्या

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर हल्ला चढविला. पंजाबच्या पवित्र भूमीवर काँग्रेसचे खुनी इरादे निष्फळ ठरल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात आल्याची तोफ इराणी यांनी डागली. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा २० मिनिटे कसा रोखला गेला? सुरक्षा व्यवस्था उधळून लावणारे पंतप्रधानांच्या वाहनाजवळ कसे पोहोचले? कोणी आंदोलनकर्त्यांना उड्डाणपुलावर नेले असे सवाल इराणी यांनी केले.

काँग्रेसकडून भाजपची खिल्ली

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर पक्षाची भूमिका मांडताना भाजपची खिल्ली उडविली. तसेच आयत्यावेळी पंतप्रधानांनी मार्ग बदलल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावाही सुरजेवाला यांनी केला. सुरजेवाला म्हणाले, की पंतप्रधानांची सुरक्षा सर्वोच्च आहे. मात्र पंतप्रधान मोदी आधी हेलिकॉप्टरने जाणार होते. आयत्यावेळी पंतप्रधानांनी वाहनाद्वारे हुसैनीवाला येथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. यासाठी लागणाऱ्या वेळामुळे त्यांना पंधरा मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी पंजाब सरकारकडून झाली नसल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modinawab malik
loading image
go to top