esakal | गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट वसुलीचे आरोप झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सकाळी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर भाष्य केले.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही : जयंत पाटील 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पोलिस अधिकारी परम बीर सिंग यांच्या पत्रानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर थेट वसुलीचे आरोप झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सकाळी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर भाष्य केले. या संदर्भात पक्षाच्या नेत्यांची कोणतिही बैठक होणार नसल्याचे पवार यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासून देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आज, सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले होते. आज, दिल्लीतल्या बैठकीनंतरही त्यांनी हीच भूमिका मांडली. गृहमंत्री देशमुख यांनी बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधला त्यात त्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले.

काय म्हणाले जयंत पाटील?
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची अडीच तास बैठक झाली. त्या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. त्या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरचे स्फोटकांचे वाहन आणि त्या कारचे मालक मनसूख हिरेन यांची हत्या या दोन घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. या दोन गुन्ह्यांचा तपास एटीएस आणि एनआयए करत आहे. या दोन्हीही गुन्ह्यांमधील ठोस गोष्टी लवकरच बाहेर येतील. मग, त्यात वरिष्ठ अधिकारी सामील असले तरी ते स्पष्ट होणार आहे. पण, या मूळ विषयापासून मीडियाला आणि सगळ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.' 

हे वाचा - ज्युलियो रिबेरोंचं नाव घेत शरद पवारांनी काढली परम बीर सिंग यांची 'विकेट'?

जयंत पाटील यांचा फडणवीसांवर पलटवार
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरचे स्फोटकांचे वाहन आणि त्या कारचे मालक मनसूख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांची दखल घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. विशेषतः विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय पहिल्यापासून लावून धरला होता. मात्र, त्यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, 'फडणवीस यांच्या अनेक मंत्र्यांवर खूप आरोप झाले आहेत. पण, त्यांनी कोणालाही राजीनामा द्यावा लावला नाही. आम्ही त्या विषयांच्या खोलात जात नाही. कारण आमची त्यांच्याशी ती स्पर्धा नाही. पण, मुख्य विषयावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्यासाठी दोन मुख्य गुन्ह्याच्या घटना महत्त्वाच्या आहेत.'