
कडुलिंबात कोरोनास रोखण्याचे सामर्थ्य; कोलकत्ता आयसरचे संशोधन
नवी दिल्ली - सर्वाधिक औषधी वनस्पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या वृक्षाचा आणखी एक अनोखा फायदा समोर आला आहे. या झाडाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या औषधाचा कोरोनावरील उपचारात तर उपयोग होतोच पण त्याचबरोबर या विषाणूच्या संसर्गाला देखील ते पायबंद घालत असल्याचे दिसून आले आहे.
कोलकत्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कडुनिंबाची झाडे आढळून येतात. भारतीय आयुर्वेदाने फार पूर्वीच या वृक्षाचे औषधी गुणधर्म ओळखून त्यांचा विविध आजारांवरील उपचारामध्ये वापर करायला सुरूवात केली होती, अशी माहिती संशोधकांनी दिली. कडुनिंबाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या अर्काचा मलेरिया, पोटदुखी, अल्सर, त्वचा विकार आणि अन्य आजारांवरील उपचारासाठी वापर केला जातो.
‘जर्नल व्हायरोलॉजी’ या नियतकालिकामध्ये ताजे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये कडुनिंबाच्या झाडात मोठ्या प्रमाणावर व्हायरल प्रोटीन असल्याचे उघड झाले आहे. मूळ कोरोना विषाणू आता वेगवेगळ्या रुपामध्ये समोर येतो आहे. या कोरोनाच्या उपप्रकारांना रोखण्याचे सामर्थ्य देखील कडुनिंबामध्ये असल्याचे दिसून आले.
म्हणून औषध प्रभावी
कडुनिंबावर आधारित उपचारपद्धतीचा विकास घडवून आणणे हा या संशोधनाच्या मागचा मुख्य हेतू होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेकांना गंभीर आजार होण्याचा धोका असतो, त्या आजारांना रोखण्याचे सामर्थ्य देखील कडुनिंबामध्ये असल्याचे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोमधील संशोधक मारिया नागेल यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या प्रत्येक उपप्रकाराला रोखणारी उपचार पद्धती संशोधक विकसित करू शकत नाही. अशा स्थितीमध्ये कडुनिंबापासून तयार करण्यात आलेले औषध अधिक प्रभावी ठरू शकते.
मानवी फुफ्फुसावरही परिणाम
आयसर कोलकतामधील संशोधकांनी कडुनिंबाच्या खोडाचे औषधी गुणधर्म तपासले असता त्यामध्ये कोरोनाविरोधी अनेक औषधी तत्त्व असल्याचे आढळून आले. कडुनिंबातील औषधी घटक हे मानवी पेशींमधील स्पाईक प्रोटीनला अटकाव करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाला पायबंद होतो. कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधकांनी कडुनिंबाचा मानवी फुफ्फुसाच्या पेशींवर नेमका काय परिणाम होतो, हे देखील पडताळून पाहिले असता त्यातून सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत.