#BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या

टीम ई-सकाळ
Tuesday, 10 November 2020

अॅमेझॉन भारतीय संस्कृतीचा वारंवार अपमान करत असल्याने अनेक नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवरून खरेदी करणे बंद केले आहे. ​

ऑनलाइन विश्वातील नामांकित ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण अॅमेझॉनने हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे आणि पायपुसण्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे. अॅमेझॉनचा निषेध व्यक्त करत नेटकऱ्यांनी ट्विटरवर #BoycottAmazon हॅशटॅग सुरू केला आहे. या वस्तूंच्या विक्रीवर तातडीने बंदी घालावी अशी मागणीही केली आहे. 

दिवाळीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी उलाढाल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेल्या पायपुसण्या आणि अंतर्वस्त्रे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजॉस यांनाही ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. 

हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेल्या उत्पादनांना परदेशात मोठी मागणी आहे. अलीकडे भारतातही त्यांना पसंती दिली जात आहे. पण पायपुसणी आणि अंतर्वस्त्र यांसारख्या वस्तूंवर ती छापली गेल्याने नेटकरी संतापले आहेत. अॅमेझॉन भारतीय संस्कृतीचा वारंवार अपमान करत असल्याने अनेक नेटकऱ्यांनी अॅमेझॉनवरून खरेदी करणे बंद केले आहे.  

यापूर्वीही अॅमेझॉनने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकराचे वर्तन केले आहे. तेव्हा अशा प्रकारच्या उत्पादनांची विक्री केली जाणार नाही. यापुढे काळजी घेतली जाईल, असे अॅमेझॉनने स्पष्ट केले होते. पण, पहिले पाढे पंच्चावन्न असाच प्रकार अॅमेझॉन करत असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens express displeasure over Amazon for selling Om printed doormats