भाजपचा भर ‘डिजीटल' महापालिकेवर! १२ मुद्यांचा जाहीरनामा प्रसिध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

दिल्ली महापालिका जिंकण्यासाठी सारा जोर लावणाऱया भारतीय जनता पक्षाने मोबाईल ॲपच्या माध्यमातून दिल्लीकरांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

BJP Politics : भाजपचा भर ‘डिजीटल' महापालिकेवर! १२ मुद्यांचा जाहीरनामा प्रसिध्द

नवी दिल्ली - दिल्ली महापालिका जिंकण्यासाठी सारा जोर लावणाऱया भारतीय जनता पक्षाने मोबाईल ॲपच्या माध्यमातून दिल्लीकरांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ॲपच्या धर्तीवर भाजप दिल्लीत माय एमसीडी ॲप बनविणार आहे. दिल्लीतील प्रभावी अशा पूर्वांचली मतदारांसाठी १ हजार पक्के छट घाट बनविणे, शालेय मुलींना मोफत सायकल व ५० ‘जन रसोई‘ केंद्रे या आश्वासनांचाही भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश आहे.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल, प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता आदींच्या उपस्थितीत भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा आज प्रकाशित केला.

भाजप जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे -

- माय एमसीडी ॲप द्वारे १०० दिवसांच्या आत अर्ज करून परवाना, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी फेसलेस सिस्टम सुरू करणार.

- २०२४ पर्यंत कचऱ्याचे तीनही डोंगर स्वच्छ करून या हजारो टन कचऱयाच्या सेंद्रिय बागा बनवणार.

- ५ वर्षात १००० इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रे बनविणार.

- 5 रूपयांत जेवण देणारी 50 फिरती जन रसोई केंद्रे स्थापन करणार.

- ५ वर्षात ७ लाख गरिबांना घरे देणार.

- १०० मीटरच्या घरासाठी नकाशाची गरज नाही.

- दिल्लीतील आठवडी बाजार नियमित करणार.

- ५ वीच्या पुढील गुणवंत विद्यार्थिनींना मोफत सायकल, गरीब विधवांच्या मुलींच्या लग्नात ३० हजारांवरून ५० हजारांचे शासकीय अनुदान देणार.

- मनपाच्या सर्व शाळांमध्ये ‘स्मार्ट क्लास रूम' बनवणार.

- मनपाच्या १५ हजार उद्यानांमध्ये ‘योग कुटिरे‘ केंद्रे बांधली जाणार असून येथे मल्लखांब, खोखोचेही प्रशिक्षण देणार.

- दिल्लीच्या सर्व बागांत यमुना काठावर १००० पक्के छट घाट बनविणार.

विहिंपचे हिंदू मागणीपत्र !

विश्व हिंदू परिषदेने दिल्लीच्या झंडेवाला देवी मंदिरात ‘हिंदू मागणीपत्र' जारी केले. विहिंपचे दिल्ली प्रांत अध्यक्ष कपिल खन्ना, सहमंत्री अशोक गुप्ता आणि सहप्रसिद्धी प्रमुख सुमित अलग उपस्थित होते. खन्ना म्हणाले की प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा जारी करतो, परंतु त्यात हिंदूंच्या हिताची काळजी घेतली जात नाही, म्हणून विश्व हिंदू परिषद दिल्लीत ‘हिंदू मागणी पत्र' जारी करत आहे. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यापूर्वी दिल्लीकरांनी स्पष्टपणे सांगावे की या हिंदू मागणी पत्राची अंमलबजावणी त्यांच्या भागात करणार नाही त्यांना मते मिळवण्याचा हक्क राहणार नाही असेही आवाहन विहिंपने केले आहे.