esakal | New Delhi : भारत-चीन वाटाघाटी आज शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

desh

New Delhi : भारत-चीन वाटाघाटी आज शक्य

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत चिनी सैन्याची घुसखोरी आणि लडाख सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य माघारीच्या मुद्द्यावर भारत आणि चीन दरम्यान उद्या (ता. १०) वाटाघाटी होतील . लष्करी पातळीवरील चर्चेची ही १३ वी फेरी असेल.

ताबारेषेवरील शांतता आणि सलोख्याच्या उभयमान्य करारांचे चीनने एकतर्फी उल्लंघन केल्यामुळे हा तणाव वाढल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले असून चीनला सैन्य माघारीसाठी इशारेही दिले आहेत. सैन्य माघारीसाठी भारताच्या आवाहनाला न जुमानण्याचा पवित्रा चीनने घेतला होता. मात्र भारतीय जवानाने चिनी हद्दीला लागून असलेली कैलास रेंज, रेझांग ला हे मोक्याचे ठिकाणं काबीज केल्यानंतर चीनने वाटाघाटींची तयारी दर्शवून पेगॉंग त्सो तलावाच्या फिंगर क्षेत्रातून माघार घेतली. मात्र अजूनही हॉटस्प्रिंग भागातील संभाव्य संघर्ष बिंदूंवर चिनी सैन्याची माघार झालेली नाही.

याशिवाय देप्सांग भागातही तणाव आहे. यापार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या लष्करी पातळीवरील वाटाघाटींच्या १३ व्या फेरीमध्ये हॉट स्प्रिंग भागातील तणावबिंदूंवरील सैन्य माघार हा प्रमुख मुद्दा असेल, असे सूत्रांकडून कळते. लडाख सोबतच उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या ताबारेषेवर चिनी सैन्याच्या कुरापती वाढल्या आहेत. उत्तराखंडमध्ये काही दिवसांपूर्वी चिनी सैनिकांची घुसखोरी झाली. तर अरुणाचलमध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याच्या गस्तीपथकाला लष्कराने ताब्यात घेतले होते. यावर तोडगा निघाला असला तरी ताबारेषेनजीक धावपट्ट्या आणि पायाभूत सुविधा उभारण्याची चिनी आक्रमकता चिंतेचा विषय ठरत आहे. चिनी कारवायांबाबत भारताने मित्र देशांनाही माहिती दिली आहे.

loading image
go to top