
भारतीय लष्करातील श्वान आपल्या तीव्र घाणेंद्रियाच्या क्षमतेमुळे ओळखले जातात. या श्वानांनी स्फोटके आणि अमली पदार्थांच्या तपासातही यापूर्वी मोलाची कामगिरी बजावलीयं.
नवी दिल्ली - एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी श्वानपथकांची मदत नेहमीच घेतल जाते. मात्र, आता भारतीय लष्कराकडून कोरोनाच्या तत्काळ निदानासाठी श्वानांचा वापर केला जात आहे. हा देशातील असा पहिलाच प्रयोग असून कोरोनाच्या नेहमीच्या चाचणीतील उशीर टळून लवकर निदानाचा हेतू आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय लष्करातील श्वान आपल्या तीव्र घाणेंद्रियाच्या क्षमतेमुळे ओळखले जातात. या श्वानांनी स्फोटके आणि अमली पदार्थांच्या तपासातही यापूर्वी मोलाची कामगिरी बजावलीयं. आता ते कोरोना निदानाच्या चाचणीचे आव्हान पेलत आहेत. कोरोना ओळखण्यासाठी दोन श्वानांना लष्कराकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यापैकी कॉकर स्पॅनियल प्रजातीचा कॅस्पर हा श्वान दोन वर्षांचा आहे. मूळ तमिळनाडूतील स्वदेशी प्रजातीच्या जया या अवघ्या एक वर्षीय श्वानाचा यात समावेश आहे. या दोन श्वानांशिवाय लॅब्राडोर प्रजातीच्या आणखी आठ श्वानांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.
मीरतमधील श्वान प्रशिक्षण केंद्रातील श्वान प्रशिक्षक ले.कर्नल सुरिंदर सैनी याबाबत म्हणाले, की प्रशिक्षणानंतर या श्वानांना नोव्हेंबरमध्ये लष्कराच्या दिल्लीतील संक्रमण छावणीत ठेवले जाईल.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना निदानासाठी दोन श्वानांना केवळ लष्करात नव्हे तर भारतातही प्रथमच वापर होत आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आदी देशांत यासाठी प्रशिक्षित श्वानांचा यापूर्वीपासूनच वापर केला जातोय. भारतात हा पहिलाच प्रयोग आहे.
- ले.कर्नल सुरिंदर सैनी, श्वान प्रशिक्षक, श्वान प्रशिक्षण केंद्र, मीरत
कसे दिले जातेय प्रशिक्षण ?
या दोन्ही श्वानांना मानवी घाम व लघवी हुंगण्यास दिली जात आहे. कोरोना झालेल्या रुग्णाच्या घाम व लघवीतून बाहेर पडलेल्या विशिष्ट जैविक घटक (बायोमार्कर) ओळखण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. यात कोरोनाचा जिवंत विषाणू मात्र नसेल. नमुना पॉझिटिव्ह असल्यास त्यापुढे बसण्याचे व निगेटिव्ह असल्यास पुढे चालत जाण्याचे प्रशिक्षण श्वानांना दिले आहे. दिल्ली कॅन्टोन्मेटमधील लष्करी पशुवैद्यकीय रुग्णालयात या श्वानांकडून मंगळवारी (ता. ९) याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी, त्यांना हाताळणाऱ्यांनी पीपीई किट घातली होती.