विरोधकांची भूमिका गुरुवारी स्पष्ट होणार

ramnath kovind
ramnath kovind

आझाद; राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक अटळ

नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीतून "दलित कार्ड' खेळताना विरोधकांचे ऐक्‍य उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधी पक्षांनी यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध पवित्रा घेतला आहे. सहमतीऐवजी हा "एकतर्फी' निर्णय झाला असून विरोधकांची रणनीती गुरुवारी (ता. 22) ठरेल, असे कॉंग्रेसतर्फे आज जाहीर करण्यात आले. परंतु, अधिक सक्षम आणि लोकप्रिय दलित उमेदवाराचा मायावतींची सूचना आणि कोविंद यांची "संघ पार्श्‍वभूमी' यामुळे निवडणूक अटळ असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होताच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांना मेजवानीसाठी निमंत्रण देऊन सहमतीच्या उमेदवाराबद्दल चर्चा केली होती. विरोधकांचा सहमतीचा उमेदवार निवडण्याठी सर्वपक्षीय उपसमितीही नेमण्यात आली. त्यानंतर राजनाथसिंह आणि वेंकय्या नायडू या मंत्रिद्वयांनीही सोनिया गांधींसह शरद पवार आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधताना राष्ट्रपतिपदासाठी त्यांना अपेक्षित असलेले जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीही संभाव्य उमेदवार संघाशी संबंधित नको, अशी स्पष्ट सूचना मंत्र्यांच्या समितीला करण्यात आली होती. "टीआरएस', वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल, अण्णा द्रमुक यांचा अपवाद वगळता "एनडीए'बाहेरील 17 विरोधी पक्षांकडूनही सहमतीच्याच उमेदवाराचा आग्रह धरण्यात आला होता.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर रामनाथ कोविंद यांची उमेदवारी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आल्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. मात्र, कोविंद यांच्या नावावर कॉंग्रेसला काहीही टिप्पणी करायची नाही, असे विरोधकांच्या उमेदवार निवडीच्या उपसमितीचे प्रमुख आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. सर्व विरोधी पक्षांशी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून पुढील भूमिका ठरविली जाईल. सोनिया गांधी बैठकीचे नेतृत्व करतील. या बैठकीतच निर्णय ठरणार असल्यामुळे आता यावर कॉंग्रेस किंवा इतर पक्षांनीही बोलणे योग्य ठरणार नाही, असे आझाद म्हणाले.

बसपच्या नेत्या मायावती यांनी आडवळणाने विरोधकांचा ही दलित उमेदवार असावा, असे सुचविले आहे. दलित वर्गातील, परंतु बिगरराजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीचे नाव पुढे केले असते तर चांगले झाले असते; पण विरोधी पक्षांनी यापेक्षा सक्षम आणि लोकप्रिय दलित उमेदवार दिल्यास फेरविचाराचेही मायावतींनी सूचित दिले. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतिपदासाठी प्रणवदांच्या दर्जाचा लालकृष्ण अडवानी किंवा सुषमा स्वराज यांच्या सारखा उमेदवार देता आला असता असे म्हणत कोविंद यांच्या सक्षमतेवरच आडवळणाने प्रहार केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल असल्यामुळे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल व्यक्तिशः आनंद झाला असला, तरी पाठिंब्याबाबतचा निर्णय लालूप्रसाद यादव, सोनिया गांधी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांसोबतच चर्चेनंतरच होईल, असे सांगितले.

लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय रामविलास पासवान यांनी कोविंद यांच्या निवडीचे स्वागत केले असून, विरोधी पक्षांनी सातत्याने मोदी आणि भाजपवर दलितविरोधी असल्याची टीका चालविली होती. मात्र कोविंद यांची झालेली निवड ही मोदी आणि भाजपला दलितविरोधी मानणाऱ्यांना ही चपराक असल्याचे म्हटले आहे.

विरोधकांचा उमेदवार कोण?
राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांचा सहमतीचा उमेदवार कोण असेल याकडे लक्ष लागले आहे. या आधी जेडीयू नेते शरद यादव, पश्‍चिम बंगालचे राज्यपाल राहिलेले गोपालकृष्ण गांधी, माजी लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्या नावाची चर्चा होती. त्या वेळी मीराकुमार यांच्या नावाला कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून डाव्या पक्षांनी विरोध दर्शविताना गोपालकृष्ण गांधींचे नाव पुढे केले होते. परंतु, सत्ताधारी भाजपने रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा दिल्यामुळे विरोधकांनाही याच पठडीत आपला उमेदवार निवडणे भाग पडणार आहे. यामध्ये दलित चेहरा म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव कॉंग्रेसच्या यादीत असले तरी साहजिकच दलित आणि महिला हा निकष पाळण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहील. या निकषात केवळ मीराकुमार यांचेच बसत असल्यामुळे त्याच विरोधी पक्षांच्या सहमतीच्या उमेदवार राहतील, असे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com