अमित शहांना बोलाविल्यावरुन माजी विद्यार्थी नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

अमित शहांना बोलाविल्यावरुन माजी विद्यार्थी नाराज

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सरदार पटेल विद्यालयातील पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल याच शाळेच्या २०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आक्षेप नोंदविल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

सध्याच्या वातावरणात पटेल यांच्या विचारसरणीच्याच विरोधात असलेल्या शहा यांच्यासारख्या नेत्यास येथे निमंत्रित करणे हे या विद्यालयाच्या व शिक्षण संस्थेच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, शहा यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज या शाळेला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल जयंतीच्या कार्यक्रमास संबोधित केले.

पत्रात काय म्हटले आहे

माजी विद्यार्थ्यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे, की ‘‘ अमित शहा यांच्यासारख्या राजकारण्याला बोलावणे शाळेला टीकेचे धनी बनविण्यासारखे आहे. ज्या शिक्षणसंस्थेच्या मूळ तत्वांतच राज्यघटना व बहुलवादावर भर दिला आहे, तेथे शहा यांना बोलावल्याने याच तत्त्वांनाही धक्का बसेल.

आम्ही अशा शाळेत आहोत जी प्रश्न विचारण्यास, मतभेद व्यक्त करण्यास, युक्तिवाद आणि वादविवादाच्या लोकशाही आदर्शांना प्रोत्साहन देते. याच शाळेने आम्हाला प्रदान केलेल्या व लोकशाहीबद्दलच्या अतूट बांधिलकीतून हे पत्र लिहीत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय आघाडी असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून शहा यांचे वर्तन कायम सरदार पटेल यांच्या आदर्शांच्या विरोधात राहिले आहे.’’

टॅग्स :Amit Shahstudentdelhi