Loksabha 2019 : मोदींचा नवा फंडा! निवडणूक भारतात; पण उल्लेख पाकिस्तानचे!

Loksabha 2019 : मोदींचा नवा फंडा! निवडणूक भारतात; पण उल्लेख पाकिस्तानचे!

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची सुरवात केली. 1971 मध्ये पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात देदीप्यमान विजय मिळवून आणि बांगलादेशाची निर्मिती करूनही इंदिरा गांधी यांनी या कामगिरीचे एवढे श्रेय घेतले नव्हते. पण, देशाच्या कानाकोकोपऱ्यांत घेतलेल्या सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानपासून असलेल्या भीतीचा गाजावाजा केला आणि त्यांच्यामुळेच भारत सुरक्षित असल्याचे सांगितले.

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. पाकिस्तानची फूस असलेल्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या या कृत्यानंतर हा मुद्दा निवडणूक प्रचारात येणार, असा अंदाज आला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमध्ये "जैशे महंमद'च्या तळावर हल्ला चढविल्यानंतर त्याची खात्रीच पटली. लोकसभा निवडणूक जाहीर होताच प्रचार विकासाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आला, हे महत्त्वाचे. 2014 च्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यामुळे मोदींना सर्वोच्च स्थान मिळाले. यंदा बालाकोटची कारवाई मदतीला येईल, असे वाटते. "पाकिस्तान फोबिया'चा वापर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न यातून सुरू झाला आणि मोदींनी त्याचा पद्धतशीरपणे वापर केला.

विरोधी आघाडी आणि "महामिलावट' या शब्दांचे पाकिस्तानी माध्यमांत मथळे होत आहेत, त्यांच्या संसदेत ही नावे उच्चारली जात आहेत. "या देशात राहून पाकिस्तानची भाषा वापरणे योग्य आहे का? आपल्या देशातील एखाद्या खेड्यातील अशिक्षित माणूसही अशी भाषा वापरणार नाही,' असे मोदींनी एका सभेत म्हटले होते. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली होती. पूर्वी पाकिस्तानातून दहशतवादी येत असत, कारवाया करून परत जात असत आणि आमच्याकडे अणुबॉंब असल्याची धमकी पाकिस्तान आपल्याला देत होता.

पाकिस्तानच्या आण्विक क्षमतेला नको एवढे महत्त्व दिल्याची टीकाही मोदींनी 17 एप्रिलच्या सभेत प्रसार माध्यमांवर केली होती. राजस्थानातील बारमेरमध्ये 21 एप्रिल रोजी झालेल्या सभेत मोदींनी पुन्हा हाच मुद्दा आणला. आमच्याकडे अण्वस्त्रांचे बटण असल्याचे ते रोज सांगतात. मग आमच्याकडे काय आहे? आम्ही काय ते दिवाळीसाठी ठेवले आहेत का, असा प्रश्‍न त्यांनी केला होता. "आतंकीयों के घर मे घुस कर मारने का फैसला मैने लिया. हमने घुस कर मारा. और ये सबूत मांग रहे है,' असेही ते म्हणाले होते. "अब भारत ने पाकिस्तान की धमकी से डरने की नीती को छोड दिया. ये ठिक किया ना मैने? हमने आतंकीयों के दिल मे डर पैदा किया,' असे सांगत, "पॉंच साल से सब आतंकी धमाके बंद है ना,' असा प्रश्‍नही त्यांनी सभेत केला होता.

पाकिस्तानची सारी कृत्ये आम्ही थांबविली. त्यांना हाती कटोरा घेऊन जगभर फिरण्यासाठी भाग पाडले. आता तुम्ही खूष आहात ना, असे त्यांनी सभेत विचारले आणि आम्हाला आणखी पाच वर्षे द्या, मग बघा, असे आवाहनही केले होते. 

गुजरातमध्ये झालेल्या एका सभेतही मोदींनी "आयुष्मान भारत' योजनेवर बोलताना पाकिस्तानचा उल्लेख केला होता. जामनगरचा एखादा रहिवासी भोपाळला गेला आणि तेथे आजारी पडला, तर त्याला उपचारांसाठी जामनगरला परतण्याची गरज नाही. त्याने त्याचे "आयुष्मान भारत'चे कार्ड दाखवले, तर त्याला कोलकताच काय कराचीतही मोफत औषधोपचार मिळतील, असे ते म्हणाले होते. मात्र, चूक लक्षात आल्यावर मला कराची नव्हे, कोची म्हणावयाचे होते. सध्या माझ्या मनात शेजारच्या देशाबद्दलच विचार येत असल्याचे सांगून मोदींनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. 

नेहरू-गांधी घराण्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हेच पं. जवाहरलाल नेहरूंपेक्षा चांगले ठरले असते, असेही ते म्हणत होते. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून देश स्वतंत्र झाल्यावर स्थापन झालेल्या पहिल्या सरकारमध्येही पं. नेहरू आणि सरदार पटेल यांचे संबंध चांगलेच रहिल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

1971 च्या युद्धात जिंकलेली पाकिस्तानी भूमी त्यांनाच परत केल्याची टीका मोदींनी इंदिरा गांधी यांच्यावर केली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरही मोदींनी टीकास्त्र सोडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com