
NHAI fined Bhuni Toll Plaza : मेरठ-कर्नाळ राष्ट्रीय महामार्गावर मेरठ जिल्ह्यातील भुनी गावाजवळ भुनी टोल प्लाझा आहे. या ठिकाणी १७ ऑगस्टच्या रात्री एक संतापजनक घटना घडली. तेथील टोल कर्मचाऱ्यांनी भारतीय लष्कराचे जवान कपिल सिंग आणि त्यांचा भाऊ शिवम यांना अमानूषपणे मारहाण केली. ज्याचे तीव्र पडसादही उमटले, त्यानंतर आता या टोल प्लाझावर आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या घटनेनंतर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कठोर कारवाई केली आणि टोल संकलन एजन्सी, मेसर्स धरम सिंग अँड कंपनीवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला व कंपनीचा करार रद्द करण्याची तसेच भविष्यात टोल प्लाझाच्या बोलीमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तसेच, एनएचएआयने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात आणि टोल प्लाझावर सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली, जे कराराचे मोठे उल्लंघन आहे. तसेच, 'आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांचा सुरक्षित आणि अखंड प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.' असंही एनएचएआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे.
मेरठमधील गोटका गावातील रहिवासी असलेले लष्करी जवान कपिल सिंग १७ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या चुलत भावासोबत दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात होते. त्यांना श्रीनगरमध्ये त्यांच्या ड्युटीवर रुजू व्हावे लागणार होते. भुनी टोल प्लाझावर लांब रांग आणि वेळेअभावी कपिल यांनी टोल कर्मचाऱ्यांना गाडी लवकर बाहेर काढण्याचे आवाहन केले. वाद वाढला आणि टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना जबरदस्त मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांनी कपिल यांना अक्षरशा खांबाला बांधून काठ्यांनी मारहाण केल्याचाही आरोप आहे.
यादरम्यान, कपिल यांचा भाऊ शिवम याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर जनतेत संताप पसरला. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांचा जमाव टोल प्लाझावर जमला आणि त्यांनी टोल कर्मचाऱ्यांचा निषेध करत तोडफोड केली. या गोंधळामुळे परिसरात तणाव वाढला. मेरठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणात एफआयआर नोंदवला आणि काही आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.