देशात अल कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

 राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी अनेक ठिकाणी छापा टाकला. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केलेल्या या कारवाईत 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी अनेक ठिकाणी छापा टाकला. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केलेल्या या कारवाईत 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे. एनआयएने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथं छापा टाकला. यात अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

प्राथमिक तपासात ताब्यात घेतलेल्या अतिरेक्यांनी सोशल मीडियावर कट्टरपंथी भूमिका मांडली होती. तसंच दिल्लीसह भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्यासाठी चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावर केल्याचं समोर आलं असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हटलं आहे.

एनआयएने पश्चिम बंगालसह केरळमध्ये शनिवारी सकाळी छापे टाकले. यामध्ये पश्चिम बंगालमधून 6 तर केरळ मधून 3 दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून डिजिटल उपकरणं, कागदपत्रं, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे आणि देशी शस्त्रांसह घरीच स्फोटके तयार करण्याशी संबंधित कागदपत्रे आढळली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्यसुद्धा एनआयएने जप्त केलं आहे.

अल-कायदाच्या मॉड्युलची माहिती मिळाल्यानंतर एनआयएनं छापासत्र सुरू केलं. यामध्ये मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांकडून कट रचला जात होता अशी माहिती एनआयएने दिली आहे. 

 

हे वाचा - Corona Update - देशात 11 दिवसांत 10 लाख नवे रुग्ण; रिकव्हरी रेट दिलासादायक

एनआयएने सांगितलं की, या लोकांना सोशल मीडियावर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून सूचना येत होत्या. त्यांना कट्टरपंथी बनवण्यात आलं होतं. तसंच राजधानी दिल्लीसह भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी भडकावलं जात होतं. तसंच या कामासाठी पैशांची सोय आणि शस्त्रे, स्फोटकं खरेदीसाठी काहीजण दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते असंही एनआयएने म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIA arrested 9 al qaeda terrorists from kerla and west bengal