निर्भयाप्रकरणी चारही दोषींना फाशी; 'या' दिवशी होणार अंमलबजावणी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 7 जानेवारी 2020

दिल्ली बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी निर्भयाच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्या संदर्भात फर्मान जारी करावे, या मागणीसाठी कोर्टात याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली nirbhaya case : दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यावर आज, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. आज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीनंतर कोर्टानं हा निर्णय दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कधी होणार फाशी?
दिल्ली बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी निर्भयाच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्या संदर्भात फर्मान जारी करावे, या मागणीसाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. त्या सुनावणीत चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश कोर्टाने दिले. येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता, फाशी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या आदेशानुसार आरोपी मुकेश शर्मा, पवन गुप्ता, अक्षय आणि विनय या चौघांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. या चारही जणांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, त्यांच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला उशीर होत होता. त्यावर कोर्टाने फाशीचे फर्मान जारी केले. या दरम्यान, दोषी क्युरेटिव्ह पिटिशन (याचिका) दाखल करू शकतात, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

आणखी वाचा - अभाविपच्या बोर्डला राष्ट्रवादीनेच काळे फासले

फेरविचार याचिका फेटाळली 
कोर्टाने दोषींना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 7 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला होता. तसेच चारही दोषी आरोपींना दया याचिका दाखल करणार आहात की नाही? अशी विचारणाही केली होती. आरोपींपैकी अक्षय कुमार सिंह याने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने ती यापूर्वीच फेटाळून लावली होती. त्यामुळं चारही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirbhaya case four guilty will get death sentence on 22th january