'निर्भया'ला त्याच दिवशी मिळणार न्याय?; बक्‍सर कारागृहात फाशीची तयारी सुरु

वृत्तसंस्था
Tuesday, 10 December 2019

फाशीसाठीचे दोर तयार करण्याची माहिती असणारे पुरेसे कैदी कारागृहात असल्याने एवढ्या कमी कालावधीत दहा दोर तयार करण्यास काही अडचण येणार नाही. मागणीनुसारच असे दोर तयार केले जातात. ते आधी तयार करून साठवून ठेवले तर ते वापरायोग्य राहत नाहीत. 
- विजयकुमार अरोरा, बक्‍सर तुरुंगाचे अधीक्षक 

पाटणा : "निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी लवकरच होणार असल्याचे दिसत आहे. बिहारमधील बक्‍सर कारागृहाला या आठवड्याअखेरिस फाशी देण्याचा दोर तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही प्रसारमाध्यमांच्या अंदाजानुसार या महिनाअखेरिस शिक्षेची अमलबजावणी होणार आहे. निर्भयावर 16 डिसेंबरला दिल्लीत सामुहिक बलात्कार झाला होता, त्यादिवशीच तिला न्याय मिळण्याची शक्यता आहे.

फाशीचा दोर तयार करणारे बक्‍सर कारागृह हे राज्यातील एकमेव आहे. या तुरुंगाला दोर तयार करण्याचा आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आला आहे. मात्र हा आदेश कुणी व कशासाठी दिला याची कल्पना तुरुंग प्रशासनाला नाही. बक्‍सर तुरुंगाचे अधीक्षक विजयकुमार अरोरा यांनी याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली. ते म्हणाले, "सुमारे दहा दोर 14 डिसेंबरपर्यंत तयार ठेवण्याची सूचना आम्हाला गेल्या आठवड्यात मिळाली. हे दोर कोठे वापरायचे आहेत, याची कल्पना आम्हाला नाही. बक्‍सर तुरुंगात फार पूर्वीपासून फाशीचे दोर तयार केले जातात. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फासावर लटकवण्यासाठी याच तुरुंगातून तयार केलेल्या दोराचा वापर केला होता. 2016-17 मध्ये आम्हाला त्यासाठी पतियाळा तुरुंगातून आदेश मिळाले होते. मात्र, त्याचा उद्देश तेव्हा आम्हाला माहीत नव्हता.'' 

फाशीच्या एका दोरासाठी सात हजार 200 कच्चे धागे वापरले जातात. तो तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. हे सर्व काम हाताने केले जाते. पाच-सहा कैदी यावर काम करतात. याची लड तयार करण्यासाठी यंत्राचा वापर होतो. या आधी तुरुंगात तयार केलेल्या दोराची किंमत एक हजार 725 रुपये होती. लोखंड आणि पितळ यांच्या भाव ज्याप्रमाणे असतील तसे दोराच्या किंमतीत बदल होत जातो. कैद्याच्या गळ्याभोवती दोर आवळला जाण्यासाठी या धातूंचा उपयोग होतो, असे अरोरा म्हणाले. 

फाशीसाठीचे दोर तयार करण्याची माहिती असणारे पुरेसे कैदी कारागृहात असल्याने एवढ्या कमी कालावधीत दहा दोर तयार करण्यास काही अडचण येणार नाही. मागणीनुसारच असे दोर तयार केले जातात. ते आधी तयार करून साठवून ठेवले तर ते वापरायोग्य राहत नाहीत. 
- विजयकुमार अरोरा, बक्‍सर तुरुंगाचे अधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya rape case 10 Neck noose prepared in Bihar Buxar Jail