esakal | सहा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी राहुल गांधींचे मौन; सितारमण यांचा निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

nirmala sitaraman

बिहारमध्ये राहणाऱ्या एका मुलीवर पंजाबमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

सहा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी राहुल गांधींचे मौन; सितारमण यांचा निशाणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आता बिहारमध्ये राहणाऱ्या एका मुलीवर पंजाबमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निषाणा साधताना म्हटलं की, ट्विट फ्रेंडली नेते राहुल गांधी या घटनेबद्दल एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी एकही ट्विट केलं नाही की नाराजीसुद्धा व्यक्त केली नाही की पिकनिकसुद्धा केली नाही असं म्हणत हाथरसप्रमाणे टांडा इथं भेट दिली नसल्यावरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसनं या प्रकरणी उत्तर देण्यासाठी पुढे यायला हवं होतं असंही निर्मला सितारमण यांनी म्हटलं.

बिहारमध्ये काँग्रेससोबत आघाडी करून राष्ट्रीय जनता दल निवडणूक लढवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावरही निर्मला सितारमण यांनी हल्लाबोल केला. त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही त्या पीडित कुटुंबाला उत्तर देण्यास बांधील नाहीत का? बिहारमधून ते कुटुंब पंजाबला गेलं होतं. आता भाजप त्या सर्व लोकांसोबत उभा असून पंजाबमध्ये या कुटुंबाला न्याय देऊ इच्छित आहे. विजय सांपला त्या ठिकाणी गेले होते आणि भाजप आता पीडित कुटुंबाला वेळेत न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करेल असंही सितारमण यांनी सांगितलं. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राहुल गांधींना टार्गेट केलं. जावडेकर यांनी राहुल गांधींच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. जे लोक हाथरस घटनेवरून बोलत होते ते टांडा इथं झालेल्या घटनेबद्दल गप्प का आहेत. तेजस्वी यादवसुद्धा या घटनेबद्दल बोलले नाहीत. ते काँग्रेसोसबत प्रचारामध्ये गुंग झाले असल्याचं जावडेकर म्हणाले.

हे वाचा - पाकिस्तानी कॉडकॉप्टरला भारतीय सैन्याने दाखवली जागा; पाहताच क्षणी केलं शूट

मूळची बिहारची असलेल्या पण पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील टांडा इथं राहणाऱ्या मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती. सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कारानंतर तिला जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिली आहे.