
इलेक्ट्रिक गाड्या पेट घेण्याच्या घटनांनंतर नितीन गडकरींचा मोठा निर्णय
हैद्राबादमध्ये इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी घरामध्ये चार्ज करत असताना पेट घेतल्याने नुकतंच एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले. या आधीही देशभरात अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या होत्या. ओला, ओकिनावा आणि जितेंद्र या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना(Electric Vehicles) आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक दुचाकींनी पेट घेण्याच्या प्रकारात ज्या कंपन्या निष्काळजीपणा करताना आढळतील, त्यांना दंड ठोठावण्यात येईल.त्या आधीच इलेक्ट्रिक गाड्या तयार करणाऱ्या कंपन्यांनी सर्व सदोष गाड्या मागे घ्याव्यात असंही गडकरी यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली असून त्याद्वारे चौकशी होणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
पुण्यातमध्ये ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडल्यानंतर सरकारने कारवाई केली होती. तसंच या कंपनीला अपघात कसा झाला आणि तो रोखण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियमावलीनुसार कोणते उपाय करता येतील याबद्दलची माहिती देण्यास सांगितलं होतं. इलेक्ट्रिक गाड्यांच्या गुणवत्तेसाठीची नियमावलीही सरकार लवकरच जारी करणार असल्याचे संकेत गडकरी यांनी दिले.
Web Title: Nitin Gadkari About Electric Vehicles Catching Fire
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..