esakal | इको-फ्रेंडली मास्क; आता फेकलेल्या मास्कमधून उगवणार झाडं

बोलून बातमी शोधा

इको-फ्रेंडली मास्क; आता फेकलेल्या मास्कमधून उगवणार झाडं
इको-फ्रेंडली मास्क; आता फेकलेल्या मास्कमधून उगवणार झाडं
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोनासारख्या असाध्य विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. भारतातदेखील या विषाणूने शिरकाव केला असून आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या दिवसात स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेणं, बाहेर पडतांना मास्क वापरणं बंधनकारक झालं आहे. कोरोनाचा विषाणू श्वसनाद्वारे किंवा मुखावाटे थेट शरीरात प्रवेश करु शकतो. त्यामुळे मास्क वापरणं सध्या सक्तीचं झालं असून ते अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे बाजारात सध्या विविध पद्धतीचे, रंगांचे मास्क पाहायला मिळत आहेत. अगदी सुती कापडापासून तयार करण्यात येणाऱ्या मास्कमध्ये व्हरायटी पाहायला मिळत आहे. मात्र, मंगळुरूमध्ये एका तरुणाने चक्क पर्यावरणपूरक मास्क तयार केला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक जण मास्क वापरत आहे. परंतु, काही मास्क एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरता येत नसल्यामुळे ते फेकून द्यावे लागत आहेत. यामध्येच जितक्या मास्कची निर्मिती होत आहे, तितक्याच संख्येने ते रस्त्यावर इतरत्र फेकूनदेखील दिल्याचं पाहायला मिळत आहे. इतरत्र फेकलेल्या या मास्तमुळे पर्यावरणाचा -हास होत असून प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वातावरणातील प्रदूषण वाढू नये व जास्तीत जास्त झाडांची लागवड करता यावी यासाठी कर्नाटकातील नितीन वास (Nitin Vas) या तरुणाने भन्नाट शक्कल लढवली आहे.

हेही वाचा: Veg - Non veg; रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ

नितीन वास यांची कर्नाटकमध्ये पेपर सीड कंपनी असून त्यांनी अनोखे मास्क तयार केले आहेत. हे मास्क फेकून दिल्यानंतर त्यातून चक्क झाडांची लागवड होणार आहे. त्यामुळे नितीन यांच्या इकोफ्रेंडली मास्कची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

कसे तयार झाले इकोफ्रेंडली मास्क

हे मास्क कॉटनपासून तयार करण्यात आले आहेत. यात बाहेरील बाजूस कॉटनचा एक हलका पदर असून त्यात काही झाडांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. तसंच मास्कची आतील बाजू जाड असल्यामुळे तो वापरतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. इतकंच नाही, तर हा मास्क एकदा वापरल्यानंतर तो टाकून द्यावा लागले. परंतु, तो इतरत्र कुठेही टाकून न देता जमिनीत पुरण्याचा सल्ला नितीन यांनी दिला आहे. या मास्कमध्ये झाडांच्या बिया असल्यामुळे त्या जमिनीत रुजतील व त्यातून झाडं उगवतील असं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: नवऱ्याला घटस्फोट देत थाटला सासऱ्यासोबत संसार

मास्क तयार करायला लागणारा कालावधी व किंमत

हे मास्क तयार करण्यासाठी साधारणपणे ८ ते ९ तासांचा वेळ लागतो. तसंच ते तयार झाल्यावर कोरडे होण्यासाठी १२ तासांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे या मास्कमध्ये झाडांच्या बिया असल्यामुळे त्यांना फार काळ साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे नितीन सध्या तरी मोजक्या मास्कचीच निर्मिती करत आहे. इकोफ्रेंडली म्हणून चर्चेत आलेलं हे मास्क चक्क २५ रुपयांना उपलब्ध आहे.