नितीशकुमार यांचे मंत्री श्रीमंत...

मंगळवार, 3 जानेवारी 2017

मंत्री श्रीमंत होत असताना नितीशकुमार यांच्या संपत्तीत गेल्या दोन वर्षांत दोन लाख रुपयांची घट झाली आहे. त्यांचा मुलगा निशांत याच्या संपत्तीत तेरा लाख रुपये घट झाली आहे.

 

पाटणा - बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी जास्त श्रीमंत आहेत. सरकारच्या संकेतस्थळावर मंत्रिमंडळ सदस्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सलग सहाव्यांदा जाहीर करण्यात आला असून, त्यावरून ही माहिती मिळाली आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार, नितीशकुमार यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 56 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यात दिल्लीतील एक हजार चौरस फुटाच्या सदनिकेचा समावेश असून, सदनिकेची सध्याची किंमत 40 लाख रुपये आहे. त्याशिवाय नितीशकुमार यांच्याकडे दहा गायी आण पाच वासरे आहेत. त्यांच्याकडे शेतजमीन नाही आणि पाटण्यात निवासी भूखंडही नाही. मुख्यमंत्र्यांचा एकुलता एक मुलगा जास्त श्रीमंत असून, स्थावर आणि जंगम मिळून त्याच्याकडे एक कोटी 11 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

बिहार मंत्रिमंडळातील कॅबिनेट सदस्यांकडे नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात सहकारमंत्री आलोक मेहता अव्वल आहेत. त्यांची एकूण संपत्ती 6.36 कोटी रुपये असून, 6.20 कोटींच्या संपत्तीसह परिवहनमंत्री चंद्रिका राय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जलसंपत्ती मंत्र्यांकडे साडेतीन कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचा मुलगा आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यांच्याकडे दीड कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. मालदारांच्या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. 2015-16 मध्ये त्यांनी 92 हजार 991 रुपये प्राप्तिकर भरला आहे. तेजस्वी यांच्यापेक्षा त्यांचे मोठे बंधू आणि आरोग्यमंत्री तेजप्रताप जास्त श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असून, त्यात एक "बीएमडब्ल्यू' मोटार आणि 15 लाख रुपयांच्या मोटारसायकलींचा समावेश आहे.

मंत्री श्रीमंत होत असताना नितीशकुमार यांच्या संपत्तीत गेल्या दोन वर्षांत दोन लाख रुपयांची घट झाली आहे. त्यांचा मुलगा निशांत याच्या संपत्तीत तेरा लाख रुपये घट झाली आहे.

मालदार मंत्री...
56 लाख रुपये - मुख्यमंत्री नितीशकुमार

6.36 कोटी रुपये - सहकारमंत्री आलोक मेहता

6.20 कोटी रुपये - परिवहनमंत्री चंद्रिका राय

3 कोटी रुपये - आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव

1.5 कोटी रुपये - उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish kumar government has some rich ministers