नितीशकुमार - लालूप्रसादांमध्ये लवकरच काडीमोडाची चिन्हे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

नवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले नितीशकुमार लालूंशी आघाडी तोडल्यावर पुन्हा भाजपशी घरोबा करू शकतात, या आशेने भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

"लालूप्रसाद हे बिहारचे रॉबर्ट वद्रा' आहेत, असा हल्ला भाजप नेते व बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशील मोदी यांनी चढविला. त्यांच्या मते जेडीयूतील 99 टक्के कार्यकर्ते नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपबरोबर जावे या मताचे आहेत. भाजपबरोबर युती तोडण्याआधी नितीशकुमार यांनी आतासारखेच आघाडीच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊन इशारा दिला होता असे सांगून ते म्हणाले, की पक्षातून येणाऱ्या जबरदस्त दबावामुळे नितीशकुमार यांची जी चलबिचल सुरू आहे, तिचे प्रतिबिंब रामनाथ कोविंद यांना त्यांनी पाठिंबा दिला त्यात पडले. "भूमाफिया' ही लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांची ओळखच बनली आहे. गेल्या 12 वर्षांत लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीने 125 कोटींहून जास्तीची उडी घेतली आहे. याशिवाय हजारो एकर जमिनीही त्यांनी बळकावल्या आहेत. "लारा डिस्ट्रिब्यूटर्स'च्या (लालू- राबडी) माध्यमातून शेकडो बोगस कंपन्या या कुटुंबाने स्थापन केल्या आहेत. रेल्वेत व बिहार सरकारमध्ये नोकऱ्या किंवा कंत्राटे देण्याच्या मोबदल्यात लालूप्रसाद यांनी हजारो एकर जमिनी "भेट' दिल्याचे दाखवून लिहून घेतल्या. रेल्वेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्यांकडे हजारो एकर जमिनी भेट म्हणून देण्याइतका पैसा कोठून आला, असा प्रश्‍न सुशील मोदी यांनी केला.

लालूप्रसाद यांच्या या जमीन गैरव्यवहारात त्यांची पुढची पिढी राजकारणातूनच नेस्तनाबूत होईल या भीतीने बिहारमधील राजदचे दोन मंत्री केंद्रातील दोन बिहारी मंत्र्यांना नुकतेच गुप्तपणे भेटले होते. त्यांनी, लालूंची मुले ही त्यांचे भवितव्य आहेत, त्यांच्यावर केद्रीय संस्थांच्या कारवाईचा बडगा उगारू नका, ही कारवाई थांबवा, असे आर्जव केले, असा दावा करून सुशील मोदी म्हणाले, की प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्या बेनामी संपत्तीबाबत सुरू केलेली कारवाई यापुढे वेगाने होण्याची चिन्हे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar lalu yadav bjp politics marathi news sakal news