
जेडीयूला फक्त एक मंत्रीपद देऊ केले. हा फक्त सरकारमध्ये प्रतीकात्मक सहभाग झाला. आम्हाला गरज नाही हे आम्ही त्यांना कळवले आहे.
मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाहीः नितीश कुमार
नवी दिल्लीः मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले असून, त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडमधून कोणीही खासदार मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्रिमंडळात नसलो तरी आम्ही एनडीएसोबतच आहोत, असेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. जेडीयूला फक्त एक मंत्रीपद देऊ केले. हा फक्त सरकारमध्ये प्रतीकात्मक सहभाग झाला. आम्हाला गरज नाही हे आम्ही त्यांना कळवले आहे. मात्र, हा मोठा मुद्दा नाही. आम्ही एनडीएमध्येच आहोत पण नाराज नाही. आम्ही एकत्र काम करु, असेही नितीश कुमार यांनी सांगितले.
नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपने बिहारमध्ये प्रत्येकी 17 जागा लढवल्या. बिहारमध्ये जदयू-भाजप आघाडीला 40 पैकी 39 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेत भाजपचे एकटयाचे 303 खासदार असून एनडीएचा आकडा 350च्या पुढे आहे. लोकसभेत बहुमतासाठी 272 खासदारांची आवश्यकता आहे.