esakal | शिवसेनेबाबत चर्चा नाही; सोनियांच्या भेटीनंतर पवार यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

congress-ncp-shivsena

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही.

शिवसेनेबाबत चर्चा नाही; सोनियांच्या भेटीनंतर पवार यांचा खुलासा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यातील लहान लहान मित्रपक्षांना विश्‍वासात घेईल, असे पवार यांनी सांगितले आहे. या आगामी "राजकीय संवाद सत्रा'मुळे राज्यात सत्तेचा गुंता वाढला आहे. 

दरम्यान, पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर थोड्या वेळाने शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पवारांची भेट घेऊन चर्चा केली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजच्या भेटीत राज्यातील सरकारच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात होते. या भेटीपूर्वी पवार यांची संसद भवन परिसरात शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पवार सोनियांना भेटले. दोन्ही नेत्यांची भेट संपण्याच्या अवघे काही मिनीटे आधी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या भेटीचा संदर्भ देत "यापुढील प्रक्रियेसाठी दोन्ही पक्षांचे नेते दिल्लीत चर्चा करतील', असे ट्विट केले होते. पवार यांनीही पत्रकारांशी बोलताना याच आशयाची माहिती दिली. 

कॉंग्रेस नेते ए. के. ऍन्टोनी यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत तपशीलवार बोलणी झाली. परंतु, सरकार स्थापनेसाठी कोणत्या पक्षासोबत जायचे यावर काहीही चर्चा झालेली नाही. दोन्ही पक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवतील. तसेच दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते एकमेकांशी चर्चा करतील. परिस्थितीचा आढावा घेऊन मत मांडतील. त्यानंतर पुढील रणनीती ठरवतील, असे पवार म्हणाले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रित निवडणूक लढविली आहे. त्यामुळे निर्णयाआधी दोन्ही पक्षांची समहती आवश्‍यक आहे. त्यात फक्त आधी अन्य लहान पक्षांचेही मत अजमावण्याचे आज ठरले, असे पवार यांनी सांगितले. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बोलणीमुळे आघाडीतील लहान घटक पक्ष नाराज असल्याच्या बातम्या आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) या पक्षांशीही संवाद साधला जाईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या पक्षांना विश्‍वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापनेसाठी घाई नसल्याचेही संकेत त्यांनी दिले. यासाठी सहा महिने कालावधी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींकडून पाठिंबा मागितल्याबाबत विचारले असता याबाबत पवार यांनी कानावर हात ठेवले. यासंदर्भात काहीही माहिती नाही, ही बातमी माध्यमांकडूनच मिळते आहे, असे ते म्हणाले. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या बैठकांबद्दलही पवार यांनी थेट बोलण्याचे टाळले. महाराष्ट्रात ज्यांना जनादेश मिळालेला आहे ते सरकार बनवत नसल्यामुळे सरकार अद्याप का बनले नाही, यावर हे नेते विचारविनिमय करत आहेत, अशी टिप्पणी केली. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी अनौपचारिक चर्चा केली; परंतु दोन्ही कॉंग्रेसची औपचारिक भूमिका ठरलेली नसल्याचेही पवार म्हणाले. 

प्रशंसेचे कारण वेगळे! 
पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार प्रशंसा केली. त्याचा संदर्भ भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कथित जवळिकीशी जोडला जात आहे. मात्र, पवार यांनी "संसदेत गोंधळामध्ये कधीही वेलमध्ये न जाण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेचा संदर्भ पंतप्रधानांनी दिल्याचे सांगितले. राज्यात प्रामुख्याने भाजपविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक लढविली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सोबतच, भाजप आणि शिवसेना एकत्र येतील काय याबाबत विचारले असता, "हा प्रश्‍न दोन्ही पक्षांना विचारा', अशीही गुगली त्यांनी टाकली.