दिलासादायक! निपाह संसर्गाचे नवीन रुग्ण नाही, 61 लोकांचे नमुने...; केरळ सरकारची माहिती | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nipah Virus Cases:

Nipah Infection : दिलासादायक! निपाह संसर्गाचे नवीन रुग्ण नाही, 61 लोकांचे नमुने...; केरळ सरकारची माहिती

कोझिकोड (केरळ): 16 सप्टेंबरपासून राज्यात निपाह विषाणू संसर्गाचा एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती, केरळ सरकारने सोमवारी दिली. त्याच वेळी, संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 61 लोकांच्या नमुन्यांमध्ये संसर्गाची पुष्टी झालेली नसल्याचही सांगितलं.

आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, जिनोम सिक्वेन्सचे (जीनोममधील बदल) अहवाल लवकरच उपलब्ध होतील आणि राज्यात संसर्गाची दुसरी लाट आहे की नाही याची पुष्टी होईल. त्या पुढं म्हणाल्या की, दरम्यान, केंद्रीय पथके स्थानिक पातळीवर पोहोचली आहेत. सर्व संबंधित ठिकाणी सर्वेक्षण करत आहेत. राज्यात निपाह संसर्गाची शेवटची घटना 15 सप्टेंबर रोजी नोंदवण्यात आली होती.

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जॉर्ज यांनी रविवारी सांगितले होते. तसेच नऊ वर्षांच्या मुलासह चार संक्रमित लोकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून मुलाला सध्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. 36 वटवाघळांचे नमुने पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी'कडे पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून सस्तन प्राण्यांमध्ये संसर्गाची उपस्थिती शोधता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.