केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा सहभाग नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No participation in Union Cabinet again sanyukt Janata Dal President Lallan Singh

केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा सहभाग नाही

पाटणा - संयुक्त जनता दल (जेडीयू) पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याची स्पष्टोक्ती संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष लल्लन सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी २०१९ मध्येच हा निर्णय घेतला होता, असेही लल्लन सिंह यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, रामचंद्र प्रसाद सिंह (आरसीपी सिंह) यांच्यावर निशाणा साधत, ‘कोणाला विचारून केंद्रात मंत्रिपद स्वीकारले हे त्यांनाच विचारा,’ असा प्रश्‍न लल्लन सिंह यांनी उपस्थित केला. राज्यात मात्र भाजप आणि जेडीयूमध्ये सर्व आलबेल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नीती आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार यांच्या अनुपस्थिती बद्दल पत्रकारांनी विचारले असता, याबाबत नितीश यांनाच प्रश्न विचारा असेही लल्लन सिंह म्हणाले.

माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता जेडीयू नेते आणि सिंह यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. सिंह यांनी पक्षाला ‘बुडते जहाज’ असे संबोधून पक्ष सोडल्यानंतर, त्यांच्या समर्थकांनी सिंह यांच्याविरुद्ध पक्षात कटकारस्थाने रचली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर जेडीयूचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत, आरसीपी सिंह यांच्या आरोपांचे खंडन केले.

‘आरसीपी सिंह यांचा देखील चिराग पासवान यांच्याप्रमाणे पक्षविरोधी कारवायांसाठी वापर केला जात आहे’ असा आरोप करत लल्लन सिंह यांनी आरसीपी सिंह यांच्यासह नाव न घेता भाजपवर देखील निशाणा साधला. नितीश कुमार यांच्या इच्छेविरुद्ध आरसीपी सिंह यांनी केंद्रात मंत्रिपद स्वीकारल्याच्या धक्कादायक खुलासाही त्यांनी यावेळी केला. यानंतर, आरसीपी सिंह यांना पक्षातच नितीश कुमारांविरोधात उभे करण्याचा भाजपचा प्रयत्न चालू होता का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आरसीपी सिंह हे संघर्ष काळातील सहकारी नसून सत्तेचे भागीदार असल्याचा टोला देखील लल्लन सिंह यांनी यावेळी लगावला.

सिंह यांना नोटीस

सिंह यांना जेडीयूने कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. पत्नीच्या आणि मुलीच्या नावे बेकायदा संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सिंह यांनी मात्र उत्तर न देता, शनिवारी थेट पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. राज्यसभेत दोनवेळा निवडून गेलेल्या सिंह यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारल्याने सिंह हे नाराज झाले होते. नितीश यांना न जुमानता निर्णय घेणाऱ्या सिंह यांना बहुजन समाजातून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता ते नितीश कुमारांना जड जात असल्याचे बोलले जाते.

Web Title: No Participation In Union Cabinet Again Sanyukt Janata Dal President Lallan Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..