दिल्लीत पावसाने वाढवला थंडीचा कहर; आंदोलनातील शेतकरी मागण्यांवर ठाम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

उत्तर भारतात शीतलहर तर जोरदार आहे. मात्र त्यातच आता शनिवारी अनेक ठिकाणी पावासाच्या हलक्या सरी आणि बर्फवृष्टी झालेली पहायला मिळाली.

नवी दिल्ली : उत्तर भारतात शीतलहर तर जोरदार आहे. मात्र त्यातच आता शनिवारी अनेक ठिकाणी पावासाच्या हलक्या सरी आणि बर्फवृष्टी झालेली पहायला मिळाली. आज रविवारी राजधानी दिल्लीमध्ये देखील पाऊस पडलेला पहायला मिळाला. यामुळे थंडीत वाढ झाली. दिल्लीच्या अनेक भागात शनिवारी सकाळी रिमझिम पाऊस पहायला मिळाला. मात्र, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान 7 डिग्री सेल्सियस झाले. तर हिमाचल प्रदेशातील केलांगमध्ये तापमान शून्याच्या खाली -7.3 डिग्री सेल्सियस राहिले. याबाबतची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात रविवारी वीजांच्या कडकडासह पाऊस झाला. हवामान खात्याने आधीच याबाबतची पूर्वसूचना दिली होती. दिल्लीच्या उत्तर पश्चिम भागात, उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद, नॉयडासहित हरियाणाच्या काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे.

शेतकरी आंदोलन सुरुच
दिल्लीत कडाक्याची थंडी आपला कहर दाखवत आहेच. मात्र, त्यातच सुरु झालेल्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. असं असतानाही आपल्या मागण्यांसाठी ठाम असलेल्या शेतकऱ्यांच्या निश्चयामध्ये कसलाही फरक पडला नाहीये. या परिस्थितीत देखील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी म्हटलंय की, अशा प्रतिकूल हवामानात आम्ही रस्त्यावर राहतो आहोत. सरकार आमच्या मागण्या उद्या मान्य करेल अशी आशा आम्हाला आहे. 

प्रदुषण अद्याप कायम
सलग पाऊस पडत असूनही सलग दुसऱ्या दिवशीही राजधानी दिल्लीच्या प्रदुषणामध्ये काहीही घट झालेली नाहीये. शनिवारी देखील प्रदुषणाची  पातळी तीव्र  होती. मात्र, आज प्रदुषणापासून मुक्ती मिळण्याची आशा आहे. 

हेही वाचा - भारताला मोठं यश; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला 'कल्चर' करणारा पहिला देश​
धुक्यात अडकली दिल्ली
दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणावर धुके दाटलेले आहे. यामुळे लोकांना डोळ्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. छातीत जळजळ यांसारख्या समस्यांसह डोकेदुखी देखील होत आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीमुळे त्रासात आणखी भर पडत आहे. नव्या वर्षाची सुरवात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वांत प्रदुषित झाली आहे. त्यात पावसामुळे प्रदुषणास कारणीभूत घटक हे हवेतून खाली आले. त्यामुळे त्रास आणखी वाढला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: north india weather updates rain lashes in delhi temperature increased pollution