''आमच्या हद्दीत घुसू नका, अन्यथा...''; किम जोंग उन यांचा दक्षिण कोरियाला इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 September 2020

माफी मागितल्यानंतर 48 तास उलटतात तोच उत्तर कोरियाने शेजारी देश दक्षिण कोरियाला इशारा दिला आहे

सोल- माफी मागितल्यानंतर 48 तास उलटतात तोच उत्तर कोरियाने शेजारी देश दक्षिण कोरियाला इशारा दिला आहे. मारल्या गेलेल्या अधिकाऱ्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी तणाव निर्माण करू नये असा इशारा देण्यात आला. आमच्या हद्दीत कोणत्याही युद्धनौका पाठवू नका, असेही बजावण्यात आले. गुरुवारी मत्सोद्योग महामंडळाची नौका आपल्या हद्दीत आल्यानंतर उत्तर कोरियाने प्रारंभी त्यावरील व्यक्तीला ओळख विचारली, पण त्याने नकार दिल्यामुळे गोळ्या झाडण्यात आल्या. त्याचा मृतदेह पेटवून समुद्रात फेकण्यात आला असा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे.

उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान त्या अधिकाऱ्याचा मृतदेह मिळाला तर आम्ही तो दक्षिण कोरियाच्या ताब्यात देऊ, पण ही घटना घडली त्या ठिकाणाच्या आसपास तुमच्या युद्धनौका दिसता कामा नयेत. यिऑनप्यीआँग बेटाजवळ ही घटना घडली. शनिवारी तेथे दक्षिण कोरियाची युद्धनौका दिसली. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला.

भारताकडून सीमेवर टी-९० व टी ७० रणगाडे तैनात; १४ हजार फुटांवर लष्कर सज्ज

दरम्यान, सख्खे शेजारी असूनही कट्टर हाडवैरी असलेल्या दोन कोरियांच्या संघर्षात न भूतो अशी घटना घडली होती. दक्षिण कोरियाच्या सरकारी अधिकाऱ्याच्या शवाची विटंबना झाल्याबद्दल उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाची माफी मागितली.  दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्यावर उत्तर कोरियाच्या सैनिकांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पेटवून समुद्रात टाकण्यात आला. 

नेमके काय घडले

दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्याने उत्तर कोरियाच्या सागरी हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी त्याला उत्तर कोरियाच्या सैनिकांनी ओळख विचारली. त्यावर कोणताही प्रतिसाद न देता पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यामुळे दहा गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती उत्तर कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा संचालक सूह हून यांनी दिली. जवळपास एका दशकात उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाचा नागरिक मारला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे दक्षिण कोरियात संतापाचा उद्रेक झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: north koria chief kim jong un warns south koria