तीव्र थंडीच्या लाटेने दिल्लीसह उत्तर भारत गोठला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi cold

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट परत आली आहे.

Cold : तीव्र थंडीच्या लाटेने दिल्लीसह उत्तर भारत गोठला!

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट परत आली आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील ऐतिहासिक मुघल रोड बंद करावा लागला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर व बिहारमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान शास्त्रज्ञ आर के जेनामानी म्हणाले की राजस्थानमध्येही थंडीची लाट कायम राहणार असून उद्यापासून (ता. ३) काही दिवस दिल्लीतही तापमान आणि थंडीची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज आहे.

दिल्लीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच थंडीने किमान तापमानाचा पारा गाठला आहे. कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेत आहेत. वेगवान वारे दिवसभर वहात असल्याने दिल्लीकरांना स्वेटरच्या थरांबरोबरच दिवसाही कानटोप्या परिधान करणे भाग पडले आहे.

दिल्लीत यापुढचे तीन दिवस किमान तापमान ४ ते ६ अंशांच्या तर कमाल २० अंशांपर्यंत राहील असा अंदाज आहे. दिल्लीत काल (१ जानेवारी) किमान तापमान ५ ते साडेपाच अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. येत्या काही दिवसांत दिल्लीत धुक्याचे साम्राज्य दिवसभर कायम असेल. ४ व ५ जानेवारीला पारा आणखी घसरेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आगामी काही दिवसांत दिल्ली, हरियाणा आणि पंजाबसह भारत-गंगेच्या मैदानावर दाट धुके कायम असल्याने देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट कायम राहील. दिल्ली व उत्तर भारताच्या अनेक भागांत पाऊस आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब व जम्मू- काश्मीरमध्ये हलक्या हिमवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

इंडिया गेट, कॅनॉट प्लेसला जत्रेचे स्वरूप

कडाक्याच्या थंडीला न जुमानता दिल्लीकरांनी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शनिवार-रविवारी (३१ डिसेंबर व १ जानेवारी) इंडिया गेट, कर्तव्यपथ, कॅनॉट प्लेस या भागांत तुफान गर्दी केली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणतेही निर्बंध नसल्याने लोकांचा उत्साह अनावर होता. त्यात शनिवार-रविवार आल्याने हजारोंच्या झुंडीच्या झुंडी इंडिया गेटपासून रस्त्यारस्त्यांवर दिसत होत्या.

कस्तुरबा गांधी मार्ग, टिळक रस्ता, भगवानदास रस्ता, कोपर्निकस मार्ग, आयटीओ या रस्त्यांना अक्षरशः जत्रेचे स्वरूपले होते. गेले दोन दिवस इंडिया गेट, मंडी हाऊसच्या आसपासचे रस्ते दुपारनंतर वाहनांसाठी बंद करावे लागले. या भागातली प्रचंड वाहतूक कोंडी कालचा दिवसभर कायम राहिली. गेले दोन्ही दिवस केंद्रीय सचिवालय, मंडी हाऊस, प्रगती मैदान आदी मेट्रो स्थानकांवर पाय ठवायला जागा नाही अशी परिस्थिती दिवसा आणि उत्तरारात्रीपर्यंत कायम होती. आज (सोमवारी) कामकाजाचा दिवस असला तरी इंडिया गेटवर येणाऱया लोकांची गर्दी कायम होती.

टॅग्स :New DelhiWaveColdWinter