तोंडावर संयम ठेवा, सेवाभाव बाळगा : नरेंद्र मोदी

तोंडावर संयम ठेवा, सेवाभाव बाळगा : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत ठेवा, सेवाभाव आपल्या अंगी बाळगा,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तारूढ भाजपच्या नव्या खासदारांना कानमंत्र दिला. देशातील अल्पसंख्यांकांचा फक्त मतगठ्ठा म्हणून फक्त वापर करून प्रत्यक्षात त्यांचा छळच केला गेला. यापुढे तसे होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

मोदींनी आपल्या पहिल्याच संबोधनात भाजप खासदारांना प्रसिद्धीचा हव्यास टाळण्याचा सल्ला दिला. काहींची बडबड आमचे सारे कष्ट बरबाद करते. सकाळी सकाळी उठून वाहिन्यांच्या माइकच्या प्रेमात पडू नका. "आजकाल अनेक नरेंद्र मोदी तयार झाले आहेत व त्यांनी मंत्रिमंडळही बनविले आहे,' अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या बोलभांड खासदारांचे कान टोचले. 

ते म्हणाले, की 2014 च्या आधी देशातील सार्वत्रिक निवडणुका कंत्राटी पद्धतीच्या बनल्या होत्या. ज्यात पाच वर्षांसाठी लोक एखाद्या पक्षाला निवडून देत व त्याने चांगले काम केले नाही तर त्याला दूर करत. 2014 मध्ये देश सरकारमध्ये प्रत्यक्ष भागीदार बनला. जेव्हा पंतप्रधानांनी लाल किल्यावरून आवाहन केले तेव्हा त्याला भरभरून प्रतिसाद देताना कोट्यवधी लोकांनी गॅसची सबसिडी स्वेच्छेने सोडून दिली. या देशात गरिबांचा जसा छळ झाला तसाच तो अल्पसंख्यांकांचाही झाला. त्यांचे शिक्षण, आरोग्य याची चिंता करण्यापेक्षा त्यांना फक्त मतगठ्ठा म्हणून वापरण्यात आले. या कपटी कारस्थानाला भेदून आम्हाला अल्पसंख्यांकांचाही विश्‍वास जिंकायचा आहे. 

राज्यघटनेसमोर नतमस्तक! 
2014 मध्ये संसदेत प्रथम प्रवेश करताना मोदींनी संसदेच्या पहिल्या पायरीवर डोके ठेवले होते. आज भाषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी सेंट्रल हॉलमधील राज्यघटनेसमोर डोके टेकविले. ते म्हणाले, की भारताच्या राज्यघटनेसमोर मस्तक नमवूनच मी तुमच्याशी बोलत आहे. येथे कोणत्याही लोकप्रतिनिधीबरोबर भेदभाव केला जाऊ शकत नाही. जे आमच्याबरोबर होते आहेत व राहणार आहेत, त्या सर्वांसाठीच आम्ही आहोत, असे सांगून त्यांनी दुरावलेल्या व संभाव्य एनडी मित्रांनाही गोंजारले. 

"एनडीए'च्या नेतेपदी पुन्हा मोदी 
नवी दिल्ली : जनसंघापासून भाजपच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक म्हणजे साडेतीनशेच्या घरात निवडून आलेल्या खासदारांनी खचाखच भरलेल्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप आघाडी आणि घटकपक्षाच्या नेत्यांच्या साक्षीने व अनुमोदनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी आज फेरनिवड झाली. 

"भारत माता की जय' आणि "मोदी-मोदी'चा गजर आणि लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, प्रकाशसिंग बादल या ज्येष्ठांची उपस्थिती, अशा वातावरणात संपूर्ण भाजपमय झालेल्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदी आपल्या नव्या सरकारच्या नेतेपदी दिमाखात विराजमान झाले. 

नव्याने निवडून आलेले फक्त भाजपचे 303 व "एनडीए'चे मिळून 349 खासदारांची वर्दळ आज दुपारी चारपासूनच संसदेच्या परिसरात सुरू झाली होती. घड्याळाचा काटा साडेचारवर आला तसा सेंट्रल हॉल जवळपास पूर्ण भरला. नव्याने निवडून आलेले खासदार चकाचक वेशभूषेत आले होते. एकाने तर कमळाच्या चित्रांनी खच्चून भरलेले जॅकेट परिधान केले होते. पाचच्या सुमारास भाजपाध्यक्ष अमित शहा आल्यावर घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल, तमिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम व नागालॅंड मेघालयातील "एनडीए'चे नेते या वेळी आवर्जून उपस्थित होते. नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह या सर्वांना व्यासपीठावर जागा मिळाली होती. पहिल्या रांगेत ज्येष्ठ भाजप नेत्यांसह देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, विजय रूपानी, सर्वानंद सोनोवाल आदी भाजपचे मुख्यमंत्री व रामदास आठवलेंसारखे घटक पक्षांचे नेते होते. गडकरी-ठाकरे, आदित्यनाथ-रामलाल व फडणवीस-आदित्य ठाकरे शेजारी बसून गप्पा मारताना दिसले. 

साडेपाचच्या सुमारास मोदींचे प्रचंड जल्लोषात सेंट्रल हॉलमध्ये आगमन झाले. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री नरेंद्र तोमर यांनी सभागृहाचे कामकाज सुरू केले. प्रथम मोदींची भाजप संसदीय पक्षनेतेपदी निवड करण्याचा ठराव शहा यांनी मांडला. त्याला राजनाथसिंह व गडकरी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर "एनडीए'च्या नेतेपदी मोदींची निवड करण्याचा ठराव प्रकाशसिंग बादल यांनी मांडला. त्याला उद्धव ठाकरे, नितीशकुमार, पलानीस्वामी व रामविलास पासवान यांनी अनुमोदन दिले. 

सरकार बनविण्याचा दावा सादर 
दरम्यान, संसदेतील बैठकीनंतर रात्री मोदींनी "एनडीए'च्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. तो मंजूर होण्याची औपचारिकता पार पाडल्यावर नव्या सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा होईल. पुढच्या आठवड्यात 30 मेच्या आसपास मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावर नव्या टीमसह झटपट कामकाजाला सुरवात करण्याबद्दल मोदी कमालीचे आग्रही आहेत. नव्या मंत्रिमंडळात प्रारंभी मोदींसह सुमारे किमान 35 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com