भाजपचे आता 'मिशन कॉलिवूड'

श्‍यामल रॉय
शनिवार, 20 जुलै 2019

- लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) केले लक्ष केंद्रित.

कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय या कार्यक्रमास उपस्थित होते. 

बंगाली चित्रपटसृष्टीत पावले रोवण्यासाठी भाजपने "बंग (वंग) चलचित्र परिषद' ही संघटना स्थापन केली आहे. 2011 मध्ये राज्यात तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. अभिनेत्यांनी याची दखल घेतली आणि राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना त्यांची उपस्थिती दिसू लागली. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार आणि अन्य मंडळींनी उघडपणे तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन सुरू केले. पूर्वी ही सगळी मंडळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) समर्थ होती, हे विशेष. सत्ताबदलानंतर या मंडळींवर पक्षपाताची टीका झाली. त्यांच्या विचारधारेशी न जुळणाऱ्यांना कलाकारांची संघटना कामे देत नसल्याचा आरोप केला गेला.

भाजपच्या नव्या संघटनेत मात्र पक्षपात नसल्याचा दावा शंकुदेव पाण्डा आणि सुभद्रा मुखर्जी या कलाकारांनी केला आहे. आमच्या संघटनेत पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस आणि माकपचे समर्थक आहेत, तसेच जात्रा कलाकारही असल्याचे ते नमूद करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now BJP will Concentrate on Kollywood Industry