esakal | आता ड्राय स्वॅबवरून होणार कोरोना टेस्ट; कमी वेळेत मिळणार रिपोर्ट

बोलून बातमी शोधा

Now the corona test will be from a dry swab Reports will be received in less time
आता ड्राय स्वॅबवरून होणार कोरोना टेस्ट; कमी वेळेत मिळणार रिपोर्ट
sakal_logo
By
संतोष शाळिग्राम - सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना झाला की नाही, याची खात्री करायची, तर आरटी-पीसीआर टेस्ट करायला लागते. त्या चाचणीचे निष्कर्ष समजायला किमान २४ तास लागतात. याचा खर्चही पाचशे ते दीड हजारांपर्यंत येतो. मात्र, हा वेळ आणि खर्च अर्ध्यावर आणणारे ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञान हैदराबाद यथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

सध्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी नाकात किंवा घशातील स्वॅब घेऊन तो रसायनिक द्रव असलेल्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. कोरोनाचा संसर्ग झाला की नाही, हे पाहण्यासाठी स्वॅबमधील विविध कणांमधील आरएनएन वेगळा करण्याची (एक्सट्रॅक्शन) प्रक्रिया असते. त्यानंतरच्या चाचणीत हा आरएनए कशाचा आहे, हे समजते आणि कोरोना संसर्ग झाला की नाही, याचे निदान होते. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा असली, तर चार तासांचा अवधी लागतो.

हेही वाचा: केडगावमध्ये ऑक्सिजन अभावी 3 जणांचा मृत्यू

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) हैदराबाद येथील संस्थेने (सीसीएमबी) नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात ‘आरएनए एक्सट्रॅक्शन’ ही महत्त्वाची प्रक्रिया न करतानही ड्राय स्वॅब हा कोरोना संक्रमित आहे की नाही, याचा निष्कर्ष काढता येणार आहे. यासंस्थेत अशा प्रकारे ६० हजार चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात चाचणीचा अचूक निष्कर्ष मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सेंटर फॉर सेल्यूलर ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी

‘सीसीएमबी’तील प्रवक्ता डॉ. सोमदत्ता कारक यांनी सकाळशी बोलताना सांगितले, की नव्या तंत्रज्ञानाला ‘आयसीएमआर’ने मान्यता दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे चाचणीचे निष्कर्ष काढण्यातील महत्त्वाचा टप्पा कमी होणार असल्याने अनेक स्वॅबचे विश्‍लेषण करण्याचा वेग दुपटी वा तिपटीने वाढणार आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या स्तरावर उपलब्ध होण्यासाठी खासगी कंपन्यांना ते हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. शेखर मांडे यांनीही या संशोधनाला दुजोरा दिला आहे. नाक वा घशातील जास्तीत जास्त स्वॅब नमुन्यांचे वेगाने आणि कमी खर्चात विश्‍लेषण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. या चाचण्यासाठी नवे किट तयार करण्याची आणि मनुष्यबळाला वेगळे प्रशिक्षण देण्याचीही गरज नाही, असे ते म्हणाले.

''‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञानामुळे आरटी-पीसीआर चाचणीच्या विश्‍लेषणाचे प्रमाण तीन पटीने वाढेल. त्याची किंमत अर्ध्यावर कमी होऊ शकते. सध्या स्वॅब हा रासायनिक द्रवात टाकून त्याचे वहन करावे लागते. नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅबची हाताळणी सहज होईल, त्यासाठी खूप सुरक्षा उपायांची गरज नाही. वाहतुकीदरम्यान द्रव दूषित होण्याचा धोकाही टळेल. येत्या काही दिवसांत हे तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध होईल.''

- डॉ. राकेश मिश्रा (संचालक, सेंटर फॉर सेल्यूलर ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी, हैदराबाद)