esakal | स्मशानभूमित जळतायेत असंख्य चिता; भारतातील स्थितीची WHO ला चिंता

बोलून बातमी शोधा

tedros ghebreyesus
स्मशानभूमित जळतायेत असंख्य चिता; भारतातील स्थितीची WHO ला चिंता
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधितांनी भरलेली रुग्णालये, अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत असलेले मृतदेह, स्मशानभूमित जळणाऱ्या असंख्य चिता ही भारतातील सध्याची परिस्थिती हृदयविदारक आहे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.भारतात इतर रोगांवर काम करणाऱ्या अडीच हजारांहून अधिक वैद्यकीय तज्ञांना कोरोना उपचारांच्या कामात लावण्यात आले आहे, असेही या संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे प्रमुख डॉ.टेड्रोस घेब्रेयेसस यांनी आज भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी डब्ल्यूएचओ संपूर्णपणे मदत करीत असल्याचे म्हटले आहे. देशातील कोरोना हाताळणीबाबत त्यांनी स्पष्टपणे काही भाष्य केलेले नाही. मात्र परिस्थितीचे दाहक वर्णन करून सूचकपणे मत व्यक्त केले आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुखांनी सांगितले, की गेल्या काही दिवसात भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयांमध्ये खाटा आणि ऑक्सिजन मिळावा यासाठी समाजमाध्यमांवर विनवण्या करत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आठवडे आठवड्यांचा लॉकडाउन लावावा लागत असून यातच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो.

हेही वाचा: 'जमत नसेल तर तसं सांगा, केंद्राकडे सोपवू'; कोर्टाने केजरीवालांना सुनावलं

आजमितीला जगभरात १४ कोटी ८५ लाख कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी भारताची परिस्थिती सर्वात गंभीर असल्याचे जागतिक समूहाचे एकमत आहे. या अतिभीषण संकटात भारताला मदत करण्यासाठी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत सध्या कोविड-१९ च्या एका भयानक लाटेशी संपूर्ण लढत आहे, असे सांगून टेड्रोस ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की रुग्णालय कोविडग्रस्तांनी भरून गेली आहेत, स्मशान घाटांवर मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. भारतातील हे दृश्य अतिशय हृदयद्रावक आहे.

२६०० वैद्यकीय तज्ञ कोविडच्या कामात

डब्ल्यूएचओच्या वतीने भारतात पोलिओ तसेच टीबी म्हणजे ट्यूबरक्लोसिसच्या निर्मूलनासाठी काम करणाऱ्या २६०० वैद्यकीय तज्ञांना कोविडग्रस्तांवर उपचारांच्या कामासाठी वळवले असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्य संघटनेतर्फेही ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणे तसेच औषधी भारताला पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.