तीन राज्यांचे पोलीस, 7 तासांचे नाट्य; बग्गा यांच्या अटकेचा वाद नेमका काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Offensive statement against aap Arvind Kejriwal Allegations BJP leader Tajinder Bagga charged with kidnapping delhi
तीन राज्यांचे पोलीस, 7 तासांचे नाट्य; बग्गा यांच्या अटकेचा वाद नेमका काय? ?

तीन राज्यांचे पोलीस, 7 तासांचे नाट्य; बग्गा यांच्या अटकेचा वाद नेमका काय?

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले भाजप नेते तेजिंदर बग्गा यांना आज पंजाब पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी दिवसभरात अनेक नाट्यमय प्रसंग घडत बग्गा यांना ताब्यात घेण्याविरोधात अपहरणाचाही गुन्हा दाखल झाला. पंजाबच्या वाटेवर असलेल्या बग्गा यांना दिल्ली पोलिसांनी हरियानातून दिल्लीत परत आणले. या सर्व प्रसंगात दिल्ली, हरियाना आणि पंजाब पोलिस आमनेसामने आले, तर आम आदमी पक्ष आणि भाजप नेत्यांचेही आरोप-प्रत्यारोप रंगले.

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाविरोधात सोशल मीडियावरून वारंवार टीका करणारे भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी काश्‍मीर फाइल्स चित्रपटावरून केजरीवाल यांच्यावर दिल्लीत टिपण्णी केली होती. केजरीवाल हे काश्मिरी पंडितांचे विरोधक असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून सनी सिंग या आपच्या नेत्याने पंजाबमधील मोहाली येथे तक्रार दाखल केली होती.

पंजाबच्या पोलिसांनी आज सकाळी सकाळी एका भाजप नेत्याला दिल्लीतील घरातून ‘उचलले‘ आणि नंतर दिल्ली व हरियाणा पोलिस असा जबरदस्त लढाच रंगला. एखाद्या चित्रपटातील थरारनाट्यालाही लाजवेल अशा या नाट्याची अखेर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर झाली आणि तब्बल सात तासांनी दिल्ली पोलिस या नेत्याला घेऊन हरियाणातून निघाले ते सायंकाळी परतले....दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा हे या भाजप नेत्याचे नाव. एका राजकीय नेत्याच्या अटकेच्या प्रकरणावरू तीन तीन राज्यांचे पोलिस आमनेसामने येतात व अपहरणाचा तपास करण्याचे काम असलेल्या पोलिसांवर ‘अपहरणाचाच‘ गुन्हा दाखल होतो, हा पहिलाच प्रसंग मानला जातो.

दरम्यान दिल्ली भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सायंकाळपर्यंत आपच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आप व केजरीवाल यांचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला असून भाजप केजरीवाल यांच्या हिटलरशाहीविरूध्द आगामी काळात जोरदार रान पेटवेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिला आहे.

बग्गा यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरून आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीत काही टिप्पणी केली. बग्गा यांची नेहमीची भाषाशैली पाहता या प्रकरणातील त्यांची भाषा फारच मवाळ म्हणावी अशी दिसते. मात्र दिल्लीतील त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. कोठे तर पंजाबमध्ये... मोहालीतील आप चे नेते सनी सिंग यांनी दिलेल्या तक्रारीची त्वरित दखल पोलिसांनी घेतली. पंजाब पोलिसांनी बग्गा यांच्या पाच नोटीसा जारी केल्या. याबाबतच्या नोटींसाना बग्गा यांनी जुमानले नसल्याचा दावा करणाऱया पंजाब पोलिसांची पथके आज सकाळी साडेआठच्या सुमारास दिल्लीतील बग्गा यांच्या घरी धडकली आणि त्यांनी बग्गा यांची ‘धरपकड' करून त्यांना गाडीत बसविले. त्यानंतर या पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पंजाबच्या दिशेने सुसाट निघाला. पंजाब पोलिसांनी तेजिंदर यांना फरपटत नेले व आपल्यालाही धक्काबुक्की केलीच पण, शीख धर्मामध्ये अतीपवित्र मानली जाणारी पगडीही तेजिंदर यांना पोलिसांनी परिधान करू दिली नाही असा आरोप त्यांच्या वडीलांनी, प्रीतपाल सिंग यांनी केल्यावर या प्रकरणाला धार्मिक रंग आला. त्यांच्या तक्कारीवरून दिल्ली पोलिसांनी पंजाबच्या पोलिसांविरोधात ‘अपहरण' व अमानवीय मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर भाजप कार्यकर्ते ॲक्शन मोडवर आले व त्यांनी आपच्या कार्यालयांबाहेर निदर्शनांची जोरदार तयारी सुरू केली. पक्षाचे नेते अमित मालवीय व इतरांनी ट्विट करून, पंजाब पोलिसांच्या दंडेलशाहीविरूध्द व केजरीवाल यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप करून ट्विटचा पाऊस पाडला. इकडे बग्गा यांच्या अटकेची बातमी कानोकानी होताच दिल्ली पोलिस हाय अलर्टवर आले. केंद्रीय गृहमंत्रालयात धावपळ वाढली. पण एव्हाना पंजाब पोलिसांच्या गाड्यांनी दिल्लीची हद्द ओलांडली होती व ते हरियाणात शिरले होते. या राज्यातील भाजप सरकारलान'दिल्ली‘तून सूचना मिळाल्यावर त्यांनी पंजाब पोलिसांचा ताफा कुरुक्षेत्रात सरळसरळ अडवला व साऱ्यांनाच तेथील पोलिस ठाण्यात नेऊन ठेवले. या साऱया गदारोळात भाजप व आप यांच्या नेत्यांत शब्द युध्दाने कळस गाठला. मात्र दिल्लीबाहेर असलेले गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी प्रमुख नेत्यांपैकी कोणीही आज दिवसभर या प्रकरणावर अगदी अखेरपर्यंत भाष्य केले नाही. दिल्ली पोलिस बग्गा यांना घेऊन दिल्लीत पोचल्यावर हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी, पंजाबच्या आप सरकारने केजरीवालांवर टीका करणाऱयांसाठी त्या राज्यात एखादी छळछावणी तयार केली आहे का, असा हल्लाबोल केला.

Web Title: Offensive Statement Against Aap Arvind Kejriwal Allegations Bjp Leader Tajinder Bagga Charged With Kidnapping Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top