उमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; जम्मू काश्मीरमध्ये कर्फ्यु लागू

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

- उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांना नजरकैद
- नॅशनल काॅन्फरन्स आणि पीडीपीचे सर्व आजी माजी मंत्र्यांना नजरकैद
- जम्मू काश्मीर मध्ये १४४ कलम लागू
- शाळा/काॅलेज बंद

जम्मूत ३० हजार जवान तैनात

श्रीनगर :  उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर संदर्भात  मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांना नजरकैद करण्यात आले. त्याशिवाय नॅशनल काॅन्फरन्स आणि पीडीपीचे सर्व आजी माजी मंत्र्यांना नजरकैद करण्यात आले आहे. जम्मू भागात ३० हजार जवान तैनात करण्यात आले असून श्रीनगर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. 
 

याविषयावर फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय  बैठक घेण्यात आली होती. जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या घटनात्मक तरतुदी रद्द करण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांच्या आज झालेल्या बैठकीत प्रस्तावित बदलांना विरोध करण्याचा निर्णय एकमताने घेत तसा ठरावही करण्यात आला होता.
 

दरम्यान काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली तैनाती आणि एकापाठोपाठ एक सूचना जारी होत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 आणि कलम 35 (अ) हटवण्याची तयारी सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय जम्मू -काश्मीरचे जम्मू, काश्मीर आणि लडाख असे त्रिभाजन करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, काश्मीर खो-यात प्रचंड प्रमाणात सशस्त्र पोलीस पाठविण्यात आल्यामुळे तिथे तणाव वाढला असून, काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या भीतीने भाजीपाला, अन्नधान्य, तसेच पेट्रोल खरेदीसाठी शनिवारी प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आणि बँका व एटीएममधून पैसे काढण्यासाठीही लोकांनी गर्दी केली. इतके सशस्त्र पोलीस कशासाठी आणले, हे केंद्र सरकार वा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट न केल्याने तिथे गोंधळाचे वातावरण आहे. लोकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा, असे राज्यपालांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omar Abdullah, Mehbooba Mufti placed under house arrest; curfew imposed in Kashmir