ममतांच्या गडाचा तिसरा बुरुज ढासळला; आणखी एका आमदाराचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला चीतपट करण्यासाठी भाजपा आतापासूनच कंबर कसून कामाला लागली आहे. याआधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना जोरदार धक्का बसला होता. आणि आता ममता बॅनर्जींना आणखी एक झटका बसला आहे. तृणमूलचे आमदार शीलभद्र दत्त यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. याआधी मंत्री सुवेंदु अधिकारी आणि जितेंद्र तिवारी यांनी गुरुवारी आपला राजीनामा दिला होता. हे भाजपामध्ये सामिल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - OLX वर विकायला काढलं PM मोदींचे संसदीय कार्यालय; चार जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे. यादरम्यानच तृणमूलला मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. तृणमूल सोडणारे आणि भाजपच्या वाटेवर असणाऱ्या तृणमूलच्या नेत्यांची यादी दिवसागणिक वाढतच चालली आहे. असाही अंदाज लावला जातोय की, पक्ष सोडणारे लवकरच गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील.

सुवेंदु अधिकारी हे जर भाजपमध्ये सामिल झाले तर ते भाजपसाठी फायद्याचं ठरणार आहे. कारण 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. सुवेंदु अधिकारी हे राज्याच्या पश्चिम भागातील 50 हून अधिक जागांवरील स्थानिक नेत्यांवर चांगले नियंत्रण ठेवून आहेत, असं म्हटलं जातं. शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये सामिल होतील का हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. कारण, पश्चिम बंगालमध्ये आपलं सरकार आणण्यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more jolt to mamata banerjee tmc mla shilbhadra dutta quits trinamool congress