ओडिशात नक्षलवाद्यांची एकतर्फी शस्त्रसंधी; कोरोनामुळे समितीने घेतला निर्णय

स्मृती सागरिका कानुनगो
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नियम पाळण्याचे आवाहन
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सातत्याने हात धुवावेत, हस्तांदोलन करू नये, तोंडावर मास्क लावावा, एकत्र जमू नये, लग्न किंवा सामूहिक कार्यक्रम टाळावेत, सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे कसोशीने पालन करावे, असा सल्ला देऊन खोकला, ताप-थंडी अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन या नक्षलवादी नेत्याने नागरिकांना केले आहे.

भुवनेश्‍वर - कोरोनाव्हायरसचे सावट संपूर्ण ओडिशासह संपूर्ण देशावर असल्याने नक्षलवाद्यांनी एकतर्फी शस्त्रसंधीचा निर्णय जाहीर केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मलकनगिरी - कोरोपुट- विशाखा विभागीय समितीचे (एमकेव्हीडीसी) सचिव कैलास याने प्रसारमाध्यमांना रविवारी (ता. ५) दिलेल्या एका ध्वनिफितीत म्हटले की, देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने सुरक्षा दलांवर हल्ले न करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता दुर्गम भागात अत्यावश्‍यक सेवा पुरवावी, असे आवाहनही त्याने केले आहे. तसेच लोकांचे पगार, निवृत्त वेतनात वाढ करावी व सार्वजनिक वितरणाद्वारे देण्यात येणाऱ्या धान्यांचे प्रमाणही वाढवावे, अशी विनंती कैलास याने सरकारला केली आहे.

पोलिसांनी केली ९०० वाहने जप्त
ओडिशामधील भुवनेश्वर आणि कटक या दोन शहरांमध्ये टाळेबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी ९०० वाहने जप्त केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्र सरकारने २१ दिवसांसाठी टाळेबंदीची घोषणा केली आहे. मात्र, अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत असल्याने रविवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी नागरिकांना सामाजिक अंतर कायम ठेवून टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा अथवा फौजदारी कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला होता.  

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्या नंतरही काही नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर त्या नागरिकांची वाहने जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. नियम मोडणाऱ्या ९०० जणांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. ज्यात ६३७ वाहने भुवनेश्वर तर २५० वाहने कटक शहरातील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत बोलताना भुवनेश्वर आणि कटकचे पोलिस आयुक्त सुधांशू सारंगी म्हणाले, की नागरिकांना घराजवळील दुकानांमधून जीवनावश्यक सामान खरेदी करण्यास सांगितले असतानाही अनेक जण शहरात वाहनांवर अनावश्यक कारणांसाठी फिरताना आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर महानगर पालिका (बीएमसी) देखील जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला विक्रीसाठी मोबाइल व्हॅन चालवीत असल्याचे सारंगी यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One-sided arsenal of Maoists in Odisha