esakal | दिल्लीत दर तीन तासाला होते एका झाडाची कत्तल
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Cutting

दिल्लीत दर तीन तासाला होते एका झाडाची कत्तल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत (Delhi) मागील ५ वर्षांत सरासरी दर तीन तासांत एका वृक्षाची कत्तल (Tree Cutting) करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तोडल्या गेलेल्या वृक्षांत ब्रिटिशांनी ल्यूटियन्स दिल्लीची निर्मिती करताना लावलेले व स्वातंत्र्यानंतरही काळजीपूर्वक जोपासलेल्या अनेक जुन्या झाडांचा समावेश आहे.

ब्रिटिश काळात व स्वातंत्र्योत्तर काळातही दिल्लीच्या पर्यावरणाबाबत विलक्षण जागरूकता शासन स्तरावर दिसून येत होती.स्वातंत्र्यानंतरही बराच काळ या वृक्षांचे संवर्धन झाले. मागील पाच वर्षांत चित्र बदलले व या काळात अनेक विकासकामांच्या नावाखाली किमान १५ हजार ०९० झाडे तोडण्यात आली. म्हणजेच एका दिवसाला ८ व दर ३ तासांनी एक याप्रमाणे वृक्षतोड नवी दिल्लीत झाली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार नवी दिल्लीत गेल्या पाच-सहा वर्षांत वृक्षतोड प्रचंड प्रमाणात वाढली आहे. माहितीच्या अधिकारात दाखल केलेल्या एका याचिकेवर सरकारने दिलेल्या माहितीत हा खुलासा करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेले नवीन संसद भवन व सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांच्या कामात संसद, राजपथ या भागांतील अनेक वृक्ष तोडले जात असल्याचे दिल्लीकर रोज पाहात आहेत. संसद मार्गावर रिझर्व्ह बॅकेसमोर असलेला एक वृक्ष नुकतेच तोडण्यात आल्याचे छायाचित्र ‘सकाळ''ने अलीकडेच छापले होते.

हेही वाचा: अफगाणिस्तानातून दिवसभरात ४०० नागरिक भारतात दाखल

पर्यावरण कार्यकर्ते विक्रांत तोगड़ यांनी २०१८ मध्ये माहिती अधिकाराखाली दिल्लीतील वृक्षतोडीबाबत ५ याचिका दाखल केल्या. त्यातील चार याचिकांना केंद्रातर्फे काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. ज्या एका याचिकेवर उत्तर मिळाले त्यातून दिल्लीतील वृक्षतोड उघड झाली आहे. या उत्तरात केवळ परवानगी मागून केलेली वृक्षतोड दिली आहे. मात्र खुद्द दिल्लीत अवैध रितीने केलेली वृक्षतोड प्रचंड आहे त्याची माहिती मिळालेली नसल्याचे तोगड यांनी सांगितले. सुमीत मिश्रा या पर्यावरण कार्यकर्त्याने केलेल्या पाहणीनुसार द्वारका एक्प्रेस वे, राष्ट्रीय राजमार्ग क्र. २४, संसद व सेंट्रल व्हिस्टा , मेट्रोचे नवीन मार्ग आदींसाठी सातत्याने वृक्षतोड होत आहे. कापलेल्या प्रत्येक वृक्षामागे किती झाडे नव्याने लावली व त्यातील किती जगली याची माहिती देण्यात आलेली नाही.

एक पूर्ण झाड चौघांसाठी ऑक्सिजन

संसद भवन व राष्ट्रपती भवनाच्या (त्या काळचे व्हॉईसराय हाऊस) मागील बाजूला एका संपूर्ण रस्त्यावर पिंपळाचे वृक्ष लावलेले होते. याचे कारण पिंपळाचे झाड रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देते. व्हाईसराय जेव्हा डिनरनंतर फेरफटका मारण्यासाठी निघत तेव्हा या रस्त्याने जाताना ऑक्सिजनचा नैसर्गिक पुरवठा सुरळीत असावा हा त्यामागील हेतू होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी प्राण सोडल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखविले. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार एक पूर्ण वाढलेले झाड चार लोकांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करते

राज्यसभेतही मुद्दा चर्चेत

सर्वोच्च न्यायालयाच्या एका समितीने या वर्षी सुरवातीला म्हटल्यानुसार, एखाद्या जुन्या झाडामुळे मिळणारा ऑक्सिजन व इकोसिस्टीम गृहीत धरता त्याचे मूल्य किमान ७४, ५०० रूपये असते. १०० वर्षांपूर्वीच्या झाडाचे मूल्य १ कोटींहून जास्त असते.सध्या नवीन संसद भवन व सेंट्रल विस्टा प्रकल्पांच्या कामांत तोडण्यात येणारी बहुतांश झाडे १०० वर्षांपूर्वीची असल्याचा मुद्दा राज्यसभेत एका शून्य प्रहरादरम्यान मांडण्यात आला होता.

loading image
go to top