"लॉकडाऊनचा काहीही फायदा न झालेला भारत एकमेव देश"

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 September 2020

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. भारत एकमेव देश असेल ज्याला लॉकडाऊनचा कोणताही फायदा झाला नाही, असं ते म्हणाले आहेत. चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. हा आकडा पार करणार भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. भारतात जे लॉकडाऊनचे धोरण होते, त्यामुळे देशाला काहीही फायदा झाला नाही. विदेशातील देशांमध्ये लॉकडाऊन करण्याचा काही फायदा दिसून आला, पण भारत एकवेम देश आहे ज्याला लॉकडाऊनचा फायदा झाला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

बीएसएनएलने 20 हजार कर्मचाऱ्यांना केलं बेरोजगार

देशात ३० सप्टेंबरपर्यंत ५५ लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याचा अंदाज मी लावला होता. पण तो चूकीचा ठरताना दिसत आहे. २० सप्टेंबरपर्यंतच भारत ५५ लाखांचा आकडा पार करेल. शिवाय ३० सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६५ लाख होण्याची शक्यता आहे, असं चिदंबरम म्हणाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वचन दिले होते की, आपण २१ दिवसात कोरोना महामारीला हरवू. महाभारताचे युद्ध १९ दिवस चालले होते. यात पांडवांनी कौरवांवर मात केली होती. आपणही २१ दिवसात कोरोनावर मात करु, असं मोदी म्हणाले होते. मात्र, देश हरताना दिसत आहे. दुसरीकडे अन्य देशांमध्ये कोरोना महामारी नियंत्रणात येताना दिसत आहे, असंही चिदंबरम म्हणाले आहेत. 

'चोराच्या उलट्या बोंबा' चीन म्हणते; हक्काची एक इंच जमीनही सोडणार नाही

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येने देशात चाळीस लाखांचा टप्पा पार केला आहे. शनिवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 40,23,179 इतकी झाली आहे. मागील चोविस तासात 86,432 इतके नवे रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांतील 1089 मृतांसह आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 69,561 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या भारतात 8,46,395 अॅक्टीव्ह केसेस असून 31,07,223 लोकांनी विषाणूवर मात केली आहे. गेल्या काही दिवसांत भारतात दिवसाला 80,000 हून अधिक लोक कोविड रिग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून सर्वच स्तरात भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.  

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only Country Not Reaping Benefit Of Lockdown Appears To Be India