केजरीवाल यांचीच चौकशी व्हावी; दिल्लीच्या भाजप खासदारांचे नायब राज्यपालांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Operation Lotus Kejriwal should investigated Letter from BJP MP to Governor politics delhi

केजरीवाल यांचीच चौकशी व्हावी; दिल्लीच्या भाजप खासदारांचे नायब राज्यपालांना पत्र

नवी दिल्ली : ''ऑपरेशन लोटस'' अंतर्गत भाजप दिल्लीतील सत्तारूढ आपच्या आमदारांना कोट्यवधी रूपयांचे आमिष दाखवत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आरोप बिनबुडाचे, तद्दन खोटे आणि दिशाभूल करणारे असून त्यांचीच चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या दिल्लीतील सातही खासदारांनी केली आहे. त्यांनी याबाबत नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना बुधवारी पत्र धाडले.

भाजपने प्रत्येकी २० कोटी रुपयांची ऑफर आमदारांना देऊन दिल्ली सरकार कमकुवत करण्याचा किंबहुना पाडण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला होता. दिल्लीतील लोकनियुक्त सरकार पाडण्याच्या कारस्थानात भाजपने ‘आप’च्या ४० आमदारांना ‘विकत घेण्या‘साठी तब्बल ८०० कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत.

सिसोदिया यांना फोडण्याबाबतच्या दूरध्वनी प्रकरणाप्रमाणेच याबाबतचे पुरावे देखील केजरीवाल-सिसोदिया यांनी अद्याप दिलेले नाहीत व येथेच भाजपने त्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. केजरीवाल यांचे भाजपवरील खरेदी-विक्रीचे आरोप म्हणजे आप सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहारापासून दिल्लीकर जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह मीनाक्षी लेखी, मनोज तिवारी, परवेश वर्मा, रमेश बिधुडी आणि हंसराज हंस या खासदारांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी दूरध्वनी करून पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात आले. हे पत्र केंद्राने नियुक्त केलेल्या नायब उपराज्यपालांना लिहीलेले असल्याने केजरीवाल यांच्या अडचणी आगामी काळात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

‘त्यांची‘ नार्को चाचणी करा

आपच्या ज्या आमदारांनी त्यांना भाजपकडून दूरध्वनी गेल्याचा आरोप केला त्यांची ‘नार्को‘ चाचणी करावी अशी मागणी खासदार तिवारी यांनी केली. ते म्हणाले की या आमदारांना कोणी बोलावले, कोणी संपर्क केला किंवा कोणी संदेश पाठविला हे सत्य समोर येण्यासाठी त्यांची न्यायवैद्यक चाचणी करण्याची आवश्यकता आहे. प्रगत तंत्रज्ञानानुसार फोन करणाऱ्याची ओळख लपू शकत नाही. आप आमदारांना जर भाजपमधून दूरध्वनी आले असतील तर ते शोधणे कठीण नाही.

लढाई रस्त्यावर...

आप व भाजप नेत्यांमधील लढाई रस्त्यावर पोहोचली. भाजप प्रवक्ते गौरव भाटीया बुधवारी कौटील्य शाळेच्या बाहेर पोहोचले तेव्हा आपचे सौरभ भारद्वाज यांनी त्यांना शाळेच्या आत येण्याचाआग्रह केला. मात्र भाटीया यांनी ५०० शाळांची यादी मला द्या, नंतर पाहणीला निघू असा पवित्रा घेतला. यादी न मिळाल्याने भाटीया गाडीत बसून निघून गेले. यादरम्यान दोघांतही जोरदार वाद झाला. भाटीया यांनी बाहेरूनच पलायन केले असा आरोप भारद्वाज यांनी केला तर जुनीच शाळा सुधारल्याचा दावा करणाऱ्या आप सरकारचे खोटे ‘स्कूल मॉडेल'' असे आहे, असे भाटीया यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओद्वारे सांगितले.

Web Title: Operation Lotus Kejriwal Should Investigated Letter From Bjp Mp To Governor Politics Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..