जम्मू-काश्‍मीरमध्ये विरोधकांना "रेड' सिग्नल

पीटीआय
Saturday, 24 August 2019

नवी दिल्ली - विरोधकांच्या जम्मू-काश्‍मीर दौऱ्यात पुन्हा एकदा विघ्न आले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आताच येथे येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे नेते हे उद्या (ता. 24) काश्‍मीर खोऱ्याला भेट देणार आहेत. ही नेतेमंडळी लोकांबरोबर संवाद साधत येथील परिस्थितीही जाणून घेतील.

विरोधकांच्या या शिष्टमंडळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचा समावेश असेल, या शिष्टमंडळात ऐनवेळी राहुल गांधी यांचाही समावेश केला जाऊ शकतो. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, द्रमुकचे तिरूची सिवा, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांचाही या शिष्टमंडळात समावेश असेल. साधारणपणे दुपारी दिल्लीतून हे शिष्टमंडळ विशेष विमानाच्या माध्यमातून श्रीनगरच्या दिशेने झेपावू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition Party Red Signal in Jammu Kashmir Entry Politics