esakal | ओशोंचे चंद्रपुरातील हक्काचे घर होणार जमीनदोस्त; पूर्वजन्मातील आईंशी ऋणानुबंध
sakal

बोलून बातमी शोधा

मदनकुवर पारेख (आनंदमयी) आणि आचार्य रजनीश

ओशोंचे चंद्रपुरातील हक्काचे घर होणार जमीनदोस्त

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : चंद्रपुरातील मदनकुवर रेखचंद्र पारेख यांची एका कार्यक्रमात रजनीश (ओशो) यांच्याशी भेट झाली. पहिल्याच भेटीत मदनकुवर या पूर्वजन्मीच्या आई असल्याची अनुभूती रजनीश यांना झाली. तेव्हापासून या शहराशी त्यांचे नाते जुळले. सत्तरच्या दशकात किमान तीसवेळा त्यांनी या शहरात मुक्काम केला. ओशो ज्या घरात थांबायचे ते आता जीर्ण झाले. ते जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जगभरातील धर्मसत्तांना तर्कांनी निरूत्तर करणाऱ्या ओशोंच्या वैचारिक बैठकीचा पाया याच घरात रचला गेला. मदनकुवर याच घरात त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करायच्या. रजनीश येथेच ध्यानसाधना करायचे. रजनीश ते आचार्य रजनीश होण्यापर्यंतच्या प्रवासाचे हे घर साक्षीदार आहे. ते घर आता काळाच्या उदरात गडप होईल. या ऐतिहासिका वास्तवापासून असंख्य चंद्रपूरकर अनभिज्ञ आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मदनकुवर यांना त्यांच्या मानसपुत्रांनी (रजनीश) स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या ऐतिहासिक पत्रांचा ठेवा पारेख कटुंबीयांनी जपून ठेवला आहे.

मदनकुवर रेखचंद्र पारेख (मा.सा.) यांचे तीन वर्षांपूर्वी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पती रेखचंद्र पारेख चंद्रपुरातील बडे प्रस्थ झाले. लहानपणापासून मदनुकवर यांना अध्यात्म, साहित्य यांची आवड होती. रुढीवादी कुटुंबातील असतानाही त्यांनी कविता लिहण्याचा छंद जोपासला. त्यांचे शिक्षण केवळ चवथीपर्यंत झाले होते. त्या अनाथांसाठी आश्रम चालवायच्या. तीनशे मुलांचा त्यांनी सांभाळ केला.

हेही वाचा: बैलांसाठी बैलबंडी शेततळ्यात उतरविली अन् घडले अघटित

१९६० मध्ये वर्धा येथे जैन महामंडळाच्या एका कार्यक्रमात त्यांना कविता सादर करण्यासाठी आमंत्रण आले. त्याच कार्यक्रमात रजनीश यांचेही भाषण होते. या कार्यक्रमात विश्रामगृहाच्या पायऱ्यावर मदनकुवर आणि रजनीश यांची पहिली भेट झाली. त्यांना बघताच रजनीश स्तब्ध झाले. बऱ्याच वेळ त्यांच्याकडे बघत राहिले. त्यानंतर सायंकाळी रजनीश यांचे भाषण ऐकून मदनकुवर मंत्रमुग्ध झाल्या. रजनीशसुद्धा त्यांच्या कवितांनी प्रभावित झाले. रजनीश यांना मदनकुवर या पूर्वजन्मातील आई असल्याची खात्री पटली. रजनीश २८ आणि मदनकुवर ४० वर्षांच्या होत्या. तेव्हा जबलपूर येथे रजनीश राहायचे.

२२ नोव्हेंबर १९६० मध्ये रजनीश यांनी मदनकुवर यांना पहिले पत्र लिहिले. त्यात त्या आई असल्याचा उल्लेख केला. तेव्हापासून रजनीश यांना मदनकुवर यांनी पुत्र मानले. चंद्रपुरातील मुख्य मार्गावर पारेख यांचे घर आहे. रजनीश सुट्यांमध्ये चंद्रपुरात यायचे. 'सारंग' नावाच्या याच इमारतीत त्यांचा मुक्काम असायचा. येथेच ते ध्यानसाधना करायचे. आपल्या आईकडून मार्गदर्शन घ्यायचे. या काळात मदनकुवर यांना रजनीश यांनी शंभरावर पत्र लिहिली. शेवटचे पत्र २७ ऑगस्ट १९६४ ला आले. या पत्रांना मदनकुवर आपल्या कवितांनी उत्तर द्यायचे. या पत्रांचा संग्रह ओशो यांनी 'क्रांतीबिज' नावाच्या पुस्तकात केला आहे.

हेही वाचा: चार महिन्यांपासून अडकले कर्जमाफीचे २४ कोटी; शेतकरी वंचित

मदनकुवर यांना दोन मुली. त्या रजनीश यांना भाई म्हणायच्या. त्यातील एक सुशीला कपाडीया यांच्याशी रजनीश यांचा विशेष स्नेह होता. सुशीला यांचा विवाह या इमारतीच्या प्रांगणात १९६७ मध्ये विवाह झाला. तेव्हा रजनीश उपस्थित होते. त्यांनी तिला सीतार भेट दिला. विवाहात प्रवचनसुद्धा दिले. रजनीश यांना स्वच्छतेशी खूप आवड होती. ते आंघोळीला सुद्धा एक-एक तास लावायचे. त्यांना सर्वच वस्तू उच्च दर्जाच्या हव्या होत्या. मोह त्यागायचा असेल तर त्या गोष्टींचा वापर करा. त्याशिवाय मोहातून सुटका नाही, असा तर्क रजनीश यांचा होता.

जवळपास तीसएकदा ते चंद्रपुरात आले. त्यांना पुस्तक वाचताना कधीच बघितले नाही. परंतु त्यांना जगभरातील धर्मांचा गाढा अभ्यास होता, अशी आठवण सुशीला कटारिया यांनी सांगितली. ते आचार्य रजनीश झाल्यानंतर विदेशातील त्यांच्या अनुयायांना चंद्रपुरात पारेख यांच्याकडे पाठवायचे. पारेख याचे सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेत आहे. याच शेतात हे अनुयायी काम करायचे, असे दीपक पारेख यांनी सांगितले.

५ ते १३ सप्टेंबर १९७३ ला आचार्य रजनीश यांनी माऊंट अबू येथे ध्यानसाधना शिबिर ठेवले. हजारो अनुयांनासमोर मदनकुवर यांच्या पायावर डोके ठेवून त्या आपल्या पूर्वजन्मीच्या आई आहेत, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचे आनंदमयी असे नामकरण केले. ओशो विदेशात गेल्यानंतर त्यांचा फारसा संपर्क पारेख कुटुंबियांशी राहिला नाही. परंतु पहिली गाडी भेट आणि आपल्या पूर्वजन्माच्या आईचा ते नेहमीच आपल्या प्रवचनात उल्लेख करायचे.

रजनीश ते आचार्य रजनीश आणि आशोपर्यंतचा त्यांचा प्रवास टप्प्या-टप्याने होत गेला. त्यांच्या या जडघडणीचे चंद्रपुरातील हे घर साक्षीदार आहे. येथेच त्यांना मदनकुवर यांचे मार्गदर्शन मिळायचे. वैचारिक देवाणघेवाण व्हायची. महिलांचा अनादर करायना नाही, हा त्यांचा सल्ला रजनीश यांनी शेवटपर्यंत मानला. ज्या घरात या चर्चा व्हायच्या. ते घर आता जीर्ण झाले आहे. ते जमीनदोस्त करणे सुरू आहे. नाईलाजाने हे करावे लागत आहे, असे पारेख कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आचार्य रजनीश यांच्या वास्तव्याच्या स्पर्श असलेल्या इमारतीबाबत चंद्रपूरकर मात्र अनभिज्ञ आहे.

आचार्य रजनीशीची पहिली कार

ओशो यांना त्यांच्या जगभरातील अनुयायांनी कोट्यवधीची संपत्ती दिली. महागड्या भेटवस्तू दिल्या. त्यांच्या ताफ्यात जगभरातील नामांकित कंपन्यांच्या गाड्या असायच्या. मात्र रजनीश असताना ते चंद्रपुरात रेल्वेने यायचे. तेव्हा पारेख कुटुंबियांनी दहा हजार पाचशे रूपये खर्चून स्टॅंन्डर्ड नामक चारचाकी वाहन भेट दिली. रजनीश यांच्याकडील ही पहिली गाडी होती. त्यांना टाईपरायटर आणि टेपरेकार्डरसुद्धा पारेख कुटुंबियांनीच पहिल्यांदा दिले. मध्येप्रदशच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मुलचंदानी देशलेहरा यांनी प्रचारासाठी तीन टेपरेकार्डर आणले होते. निवडणुक झाल्यानंतर रेखचंद्रजी पारेख यांनी त्यातील दोन विकत घेतले आणि एक रजनीश यांनी दिले.

loading image
go to top