लसीकरण वाढविण्यासाठी उपाययोजना राबवा; आरोगमंत्र्यांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण वाढविण्यासाठी उपाययोजना राबवा; आरोगमंत्र्यांचा सल्ला

लसीकरण वाढविण्यासाठी उपाययोजना राबवा; आरोगमंत्र्यांचा सल्ला

नवी दिल्ली : कोरोनाची लस अद्यापही न घेतलेल्या नागरिकांच्या वेगवान लसीकरणासाठी आधुनिक उपाययोजना राबवाव्यात, लसीकरण जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनांशी समन्वय ठेवून विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि स्थानिक धर्मगुरूंचीही मदत घ्यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना आज केल्या. देशात अद्याप १२ कोटी नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशातील सर्व प्रौढ नागरिकांचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने ‘हर घर दस्तक’ ही योजना नुकतीच सुरू केली असून त्याचा आढावा मंडावीया यांनी घेतला. तीन ते ३० नोव्हेंबरपर्यंत देशभरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या ऑनलाइन आढावा बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार व इतर अधिकारी उपस्थित होते. ज्या जिल्ह्यांत पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी व दुसरा डोस घेणारांचेही प्रमाण कमी आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली. स्थानिक पातळीवर छोटी छोटी लसीकरण पथके स्थापन करावीत, अशी सूचना त्यांनी केली. लस वाया जाऊ देऊ नये, यावर त्यांनी भर दिला.

मंडावीया यांनी आजच्या बैठकीत रेल्वेस्थानके, बसस्थानके, समाजमंदिरे, शाळा अशा ठिकाणीही मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असा सल्ला दिला. संसर्गप्रसार संपला, असे सरकारला अजिबात वाटत नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, ‘हर घर दस्तक’ योजनेला गती देणे गरजेचे आहे. राज्यांना लशींची कमतरता पडू देणार नाही.

लसीकरणाचे प्रमाण

  • किमान पहिला डोस घेतलेले - ७९ टक्के

  • दोन्ही डोस घेतलेले - ३८ टक्के

loading image
go to top