दिल्ली निवडणुकीत पाकिस्तानची एंट्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

निवडणूक दिल्लीची असेल तर त्यात पाकिस्तानचे काय काम, असा प्रश्‍न तुम्हाआम्हाला पडू शकतो; पण दिल्लीत सातच्या सात खासदार असलेल्या भाजपला मात्र तो पडत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या जबरदस्त आव्हानासमोर अंतर्कलहाने धापा टाकणाऱ्या भाजपने आज शाहीन बागेतील नागरिकत्वविरोधातील निदर्शनांचा बहाणा काढून पाकिस्तानला त्यात ओढले. यासाठी भाजपने केजरीवालांचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांचा आधार घेतला.

नवी दिल्ली - निवडणूक दिल्लीची असेल तर त्यात पाकिस्तानचे काय काम, असा प्रश्‍न तुम्हाआम्हाला पडू शकतो; पण दिल्लीत सातच्या सात खासदार असलेल्या भाजपला मात्र तो पडत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या जबरदस्त आव्हानासमोर अंतर्कलहाने धापा टाकणाऱ्या भाजपने आज शाहीन बागेतील नागरिकत्वविरोधातील निदर्शनांचा बहाणा काढून पाकिस्तानला त्यात ओढले. यासाठी भाजपने केजरीवालांचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांचा आधार घेतला. मिश्रा यांनी शाहीन बागेसारखे मिनी पाकिस्तान विरोधकांनी दिल्लीत जागोजागी उभे केल्याचा बेताल आरोप केला. मिश्रा यांनी शाहीन बागेतील आंदोलनास थेट पाकशी जोडताना, आठ तारखेला दिल्लीत भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होईल अशी भाषा केली. केवळ भाजपविरोधकच नव्हे, तर सामान्य दिल्लीकरांमध्येही त्याबाबत नाराजीची भावना आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजरीवालांनी आरोप फेटाळले
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीची जनता धार्मिक मुद्द्यांवर नव्हे तर कामावरच मतदान करेल, असा विश्‍वास पुन्हा व्यक्त केला. दिल्लीच्या मटियाला या मोठ्या मतदारसंघासह विकासपुरी व परिसरात झालेल्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने उत्साहित झालेल्या केजरीवाल यांनी, दिल्लीकर ‘दिलवाले’ आहेत असे सांगून त्यांचे आभार मानले. यंदा केजरीवाल यांचा जोर सभांबरोबरच रोड शोवर राहणार असल्याचे दिसते. काँग्रेसने भाजपच्या ‘राग पाकिस्तानला’ आक्षेप घेतला आहे. पक्षप्रवक्ते जयदीप शेरगील म्हणाले, की भाजप नेते सकाळी राष्ट्रवादाचे धडे देतात, दुपारी नेहरूंवर टीका करतात, तर सायंकाळी पाकिस्तानचा राग आळवितात व रात्री पकोडे खाऊन झोपतात, कारण  मोदी सरकारच्या काळात तरुणांचे रोजगार गेले आहेत.

अमर जवान ज्योतीला श्रद्धांजली वाहण्याची परंपरा पंतप्रधान मोडणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan entry in delhi election