
पाकला मोदींच्या काश्मीर दौऱ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही; भारताने सुनावलं
पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यावर आक्षेप घेताच भारतानेही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानला पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्यावर टिपण्णी करण्याचा काहीही अधिकार नाही अशा शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे.
माध्यमांशी बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचं ज्याप्रमाणे स्वागत झालं आणि जम्मू काश्मीरमध्ये जे बदल झाले हेच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. यासोबतच बागची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्यावरही टीका केली आहे.
अरिंदम बागची म्हणाले, मला वाटतं पाकिस्तानला जम्मू काश्मीरमध्ये जे घडतंय त्याविषयी काहीही बोलण्याचा अधिकार नाही. पण मी या दौऱ्यावर आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचं उत्तर देत आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी जम्मू काश्मीरला भेट दिली. राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने त्यांनी ही भेट दिली असून देशभरातल्या ग्रामसभांना संबोधितही केलं. कलम ३७० हटवल्यानंतरचा हा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी २० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणीही केली.