
युपीतला सेक्युरिटी गार्ड अन् पाकिस्तानी तरुणीचं ऑनलाईन प्रेम; नेपाळमध्ये लग्नही केलं, पण नशीब…
बेंगळुरू पोलिसांनी बनावट ओळख तयार करून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी एका पाकिस्तानी तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकरा जीवनी नावाची १९ वर्षीय तरुणी नेपाळ सीमेवरून गेल्या वर्षी भारतात दाखल झाली होती. तिचे लग्न उत्तर प्रदेशातील 25 वर्षीय सुरक्षा रक्षक मुलायम सिंह यादव याच्याशी झालं आहे. पण नशीबाने फार काळ साथ दिली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची भेट एका गेमिंग अॅपद्वारे झाली होती. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अॅपच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ही तरुणी काही महिन्यांपूर्वी नेपाळला आली, जिथे दोघांनी लग्न केले. यानंतर हे जोडपे भारत-नेपाळ सीमा पार करून बिहारमध्ये पोहोचले होते.
हेही वाचा: Balasaheb Thackeray : बाळासाहेब हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य; अजित पवारांचे विधान
इकराचे नाव बदलून रवा यादव ठेवलं
पोलीस सूत्रांनी सांगितले की, त्यानंतर यादव आणि इकरा बेंगळुरूला राहायला आले. येथे दोघे जुन्नासंद्रा येथे भाड्याच्या घरात राहू लागले आणि यादव सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. यादवने इकरा जिवानीचे नाव बदलून रवा यादव असे ठेवले आणि तिला आपली पत्नी असल्याचा दावा करत तिचे आधार कार्ड मिळवले. नंतर त्याने भारतीय पासपोर्टसाठी अर्जही केला.
अशाप्रकारे उघडकीस आली खरी ओळख
इंटेलिजन्स ब्युरोने (IB) इकरा जिवानीचा शोध घेतल्यानंतर मुलीची खरी ओळख उघड झाली कारण ती पाकिस्तानमधील तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर आयबीने राज्याच्या गुप्तचर संस्थेला सतर्क केले. माहितीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी या जोडप्याची माहिती गोळा केली आणि त्यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा: Ajit Pawar : 'त्यांना डायपर घातले पाहिजे...'; हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर अर्वाच्च भाषेत हल्ला
इकरा जिवानीला नंतर FRRO (विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय) अधिकार्यांकडे सोपवण्यात आले, नंतर तुरुंगात पाठवण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. मुलायम सिंह यादवलाही अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विदेशी कायदा आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, घराचा मालक, गोविंदा रेड्डी, त्याच्यावरही संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण त्याने आपल्या घरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी व्यक्तीबद्दल पोलिसांना माहिती दिली नाही.